जम्मू काश्मीरमधील पीडीपी-भाजपची युती संपुष्टात

पीडीपी-भाजपची युती अवघ्या तीन वर्षातच संपुष्टात

जम्मू काश्मीरमधील मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपी सरकारचा पाठिंबा अखेर आज भाजपने काढला आहे.यामुळे आता पीडीपी-भाजपची युती अवघ्या तीन वर्षातच संपुष्टात आली आहे.  पीडीपी-भाजपच्या युतीत जे हेतू होते ते पूर्णपणे अपयशी ठरल्याचं कारण देत, जम्मू- काश्मीर सरकारमधून भाजप बाहेर पडलं असून भाजप नेते आणि जम्मू काश्मीरचे भाजप प्रभारी राम माधव यांनी पत्रकार परिषदेत याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. सीमेवरील तणाव, शस्त्रसंधीचं उल्लंघन, जवानांवर होणारी दगडफेक, कठुआ गँगरेप याबाबतच्या मुद्द्यावरुन भाजप आणि पीडीपीमध्ये तणाव होता. 

 पत्रकार परिषदेत राम माधव म्हणाले की,  गेल्या काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये ज्या घटना घडल्या, त्यावर माहिती घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आम्ही निर्णय घेतला की, युती सरकार चालवणं आता शक्य नाही.मागील तीन वर्षांपेक्षा जास्त काळापासून आम्ही आमच्या बाजूने योग्यरित्या सरकार चालवण्याचा प्रयत्न करत होतो. राज्याच्या तीन प्रमुख भागांमध्ये विकास करण्याचा प्रयत्न करत होतो. पण सध्या राज्यात जी परिस्थिती आहे, त्यामध्ये दहशतवाद आणि हिंसाचाराचं प्रमाण अधिक आहे. फुटीरतावाद वाढला आहे. नागरिकांचा मूलभूत अधिकार आणि व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आहे, असंही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.