जमिनीच्या वादातून दुहेरी हत्याकांड, दाम्पत्याला टँकरखाली चिरडले,टँकर चालकाला अटक

अंबरनाथ:- जमिनीच्या वादाचा राग मनात धरुन दाम्पत्याला टँकरखाली चिरडून मारल्याची घटना घडली. याप्रकरणी ४ जणांविरूध्द हिललाईन पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, टँकर चालकाला पोलिसांनी अटक केली.

        वासुदेव शेंद्रे (वय ५०) व पत्नी रेखा (वय ४०) असे टँकरखाली चिरडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी अरविंदकुमार कोरी (वय २२) असे अटक करण्यात आलेल्या टँकरचालकचे नाव आहे. तर विलास पाटील, विनोद पाटील, बाळाराम पाटील अशी फरार असलेल्या आरोपींची नावे आहे. 

         अंबरनाथ तालुक्यातील मलंगवाडी नाऱ्हेण गावात राहणाऱ्या शेंद्रे व पाटील या कुटूंबीयात जमिनीवरून वादविवाद सुरू होते. वासुदेव हे पत्नी रेखासोबत मोटरसायकलवरून बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास लग्नाला जात होते. त्यावेळी तळोजा रोडवरील बाळेगाव एसआरपीएफ कॅम्पजवळ पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने त्यांच्या मोटरसायकलला उडवून, त्यांच्या अंगावर टँकर घालून दाम्पत्याला ठार मारले. या घटनेची माहिती हिललाईन पोलिसांना मिळताच पो.नि. एस. के. जाधव यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. परंतु वासुदेव व रेखा या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला होता. 

        ही घटना घडल्यावर टँकर चालक त्याठिकाणाहून पळून गेला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन टँकरचालक अरविंदकुमार कोरी याला ताब्यात घेतले. या घटनेप्रकरणी कैलास शेंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिललाईन पोलीस ठाण्यात विलास, विनोद, बाळाराम व टँकरचालक अरविंदकुमार या चौघांविरूध्द या दुहेरी हत्याकांडप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंदकुमार याला अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयात हजर केले असता २ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. इतर फरार असलेल्या ३ आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email