जपानमधल्या टोकिओ येथे पंतप्रधान मोदींनी “मेक इन इंडिया” चर्चासत्राला केले संबोधन
जपानमधल्या टोकिओ येथे आयोजित “मेक इन इंडिया: आफ्रिकेतील भारत-जपान भागीदारी आणि डिजिटल भागीदारी” या विषयावरील चर्चासत्राला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. व्यवसायात तसेच नागरिकांच्या जीवनमानातील सुलभता अधिक वृद्धींगत करण्यावर सरकार कशाप्रकारे लक्ष केंद्रीत करत आहे हे पंतप्रधानांनी सांगितले. भारतात मोठ्या संख्येने कार्यरत असलेल्या जपानी कंपन्यांबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. गेल्या चार वर्षातील भारताच्या आर्थिक कामगिरीचे सामर्थ्य पंतप्रधानांनी विस्तृतपणे विषद केले. भारत आज सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असल्याचे ते म्हणाले. डिजिटल व्यवहार, वस्तू आणि सेवा कर तसेच अनौपचारिक अर्थव्यवस्थेकडून औपचारिक अर्थव्यवस्थेकडे झालेल्या प्रवासाचा त्यांनी उल्लेख केला.
भारताची विकसित होणारी अर्थव्यवस्था, वेगाने वाढणारा मध्यम वर्ग आणि वाढती तरुण लोकसंख्या यामुळे जपानी गुंतवणुकदारांना अनेक नव्या संधी उपलब्ध होत आहेत असे पंतप्रधान म्हणाले. या संदर्भात बोलतांना त्यांनी कमी खर्चिक उत्पादन, माहिती तंत्रज्ञान उद्योग आदी विभागांचा उल्लेख केला.भारत आणि जपानमधल्या समान मूल्यांवरही पंतप्रधानांनी भर दिला. इंडो-पॅसिफिक, दक्षिण आशिया आणि आफ्रिका यासह जगाच्या अन्य भागात मजबूत विकासात्मक भागीदारी करण्याकडे दोन्ही देशांनी पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.