जन्मला मुलगा, हातात दिली मुलगी !
बीड – नुकत्याच जन्मलेल्या मुलाला श्वासोच्छ्वासास त्रास होत असल्याने जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या सल्ल्यावरून त्यास खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार पूर्ण झाल्यानंतर सुट्टी देताना रुग्णालयातून मुलाच्या ऐवजी मुलगी हातात सोपविल्याने बाळाचे नातेवाईक हवालदील झाले आहेत. हि घटना बीड शहरात घडली.
हिंगोली जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या मात्र ब्रम्हनाथ तांडा, उपळी ता धारूर येथे मजुरीसाठी आलेल्या राजू खिटे याची २३ वर्षीय पत्नी छाया हिस प्रसूतीसाठी दि ११ मे रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता सदरील महिला प्रसूत झाली. यावेळी महिलेस १ किलो ५०० ग्राम वजनाच्या मुलाने जन्म दिल्याचे प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आले व वजन कमी असल्याने श्वासोच्छ्वासास समस्या होत असून आपल्या सोईनुसार आपण खाजगी रुग्णालयात उपचार घेऊ शकता असे सदरील नातेवाईकांना सांगण्यात आले. आधीच ४ वर्षाची एक मुलगी असलेल्या नातेवाईकांनी मुलगा झाल्याच्या आनंदातून सदरील नवजातास शहरातील एका बालरुग्णालयात दाखल केले. येथे उपचारास समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून त्यांनी त्या नवजातास बसस्टॅण्डसमोरील दुसऱ्या बालरुग्णालयात दाखल केले. जवळपास ७-८ दिवस उपचार घेतल्यानंतर नवजाताची प्रकृती समाधानकारक झाल्यानंतर सदरील बालरुग्णालयातून बाळाला सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, रुग्णालय प्रशासनाने सदरील नातेवाईकाकडे मुलाच्या ऐवजी मुलगी सोपविली. मुलालाच जन्म दिलेला असताना मुलगी हाती दिल्याचे बघून नातेवाईकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
याप्रकरणी नातेवाईकांनी बाळाची अदलाबद्ल झाल्याचा आरोप केला आहे. नवजात असल्याने प्रत्येकवेळी बालकाला नातेवाईकांनी बघितलेले नसून नेमकी अदलाबदल शासकीय दवाखान्यात झाली कि दोन्हीपैकी एखाद्या खासगी रुग्णालयातून याबाबत नातेवाईकांमध्ये संभ्रमावस्था आहे. एनआयसीयु उपचारपद्धतीत पालकांना प्रवेशाची बंदी असल्याने निरक्षर असलेल्या पालकांना सदरील नवजातास पाहताही आले नव्हते. नवजात जन्मल्यानंतर नवजाताच्या पित्याने, आईने व इतर नातेवाईकांनी मुलगाच असल्याचा दावाही केला आहे व सोबतच शासकीय रुग्णालयातील प्रमाणपत्रहि मुलगाच असल्याचे दाखवत आहे. याबाबत नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयातील प्रसूतीपासून डिस्चार्जची सर्व कागदपत्रे तपासून पहिली असता त्यात मुलगाच असल्याचा उल्लेख दिसून आला. या अजब प्रकारामुळे आई वडिलांसह नातेवाईक मात्र हादरले आहेत. दरम्यान, या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Sources – ABI News