चाळीस हजाराची लाच घेताना सहा. पोलीस निरीक्षकासह पाच जण एसीबीच्या सापळ्यात
धारूर – ४० हजार रूपयाची लाच घेतल्याच्या आरोपावरून सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पाच जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई धारूर येथे करण्यात आली. या कारवाईने पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराविरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्यातून वगळण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक केळे यांनी एक लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या पथकाने तक्रारीची शहानिशा करून शनिवारी रात्री धारूर येथे केज रोडवरील वैद्यनाथ बँकेसमोर सापळा रचला.
तडजोडीअंती तक्रारदाराकडून ४० हजार रूपयाची लाच पोलिसांनी घेतली आणि एसीबीच्या पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक केळे, सहाय्यक उपनिरीक्षक अमीर इनामदार, पोलीस कर्मचारी बिक्कड यांच्यासह दोन खाजगी व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध धारूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एसीबीचे अधिकारी करीत आहेत.
हि कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शाखेचे पोलीस उप अधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोलीस निरीक्षक गजानन वाघ आणि बीड शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पार पाडली.