घारापुरी बेटास ऊर्जामंत्री चंद्रशेखर  बावनकुळे यांची भेट व पाहणी, 

कामाचा घेतला आढावा : घारापुरी बेट लवकरच उजळणार
(म विजय)
घारापुरी बेटास वीज पुरवठा करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प महावितरणमार्फत सूरु आहे. हा प्रकप्ल लवकरच पूर्ण होणार असून या प्रकल्पाची पाहणी मा. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना काही अत्यावश्यक सूचनाही केल्या. यावेळी त्यांच्या सोबत उरण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष महेश बालदी, प्रधान सचिव(ऊर्जा) अरविंदसिंह, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, संचालक (प्रकल्प) दिनेश साबू, कोकण प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक संचालक सतिश करपे व भांडुप नागरी परिमंडळाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण उपस्थित होत्या. या प्रकल्पाचा  फायदा घारापुरी बेटावरील सुमारे ९५० लोकांना व जागतिक वारसा लाभलेल्या घारापुरी लेणी यांच्या पर्यटन विकासाकरता होणार आहे.
या भेटी दरम्यान मा. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घारापुरी बेटावर दिवाबत्तीची (स्ट्रीट लाईट) सोय करण्याबाबत सूचना दिल्या असून त्याबाबतचा एक कोटीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्याना दिल्या आहेत. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी मा. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे घारापुरीच्या विद्युतीकरणासाठी आभार मानले. या संपूर्ण प्रकल्पास आज अखेर १८.५ कोटी इतका खर्च आला आहे.
महावितरणतर्फे राज्यात प्रथमच समुद्र तळा खालून केबल टाकण्याचे कामाचा करण्यात आले असून ‘सीआरझेड’, वन विभाग, भारतीय नवसेना, भारतीय पुरातत्व विभाग, जेएनपीटी, सीडको, नवी मुंबई मुन्सिपल कॉर्पोरेशन(एनएमएमसी) अशा विविध कार्यालयांची परवानगी मिळाल्या नंतर फेब्रुवारी २०१७ मध्ये या कामाची सुरवात झाली होती. यामध्ये प्रामुख्याने २२ केव्ही, सिंगल कोअर केबल (३+१अतिरिक्त केबल) समुद्राखालून ७ किमी टाकण्याचे काम करण्यात आले आहे. तसेच त्या केबलची प्राथमिक चाचणी यशस्वी पणे पूर्ण करण्यात आली आहे. सदर काम करण्यासाठी प्लाउ (Plough) तंत्रज्ञान पद्धतीचा वापर करण्यात आला. या कामासाठी रु.१६कोटी इतका खर्च करण्यात आले.
महावितरणमार्फत घारापुरी बेटास या सबमरीन केबल मार्फत देण्यात आलेला हा वीज पुरवठा हा पनवेल विभागातील टी.एस.रेहमान या उपकेंद्रातून देण्यात आलेला आहे. तसेच घारापुरी बेटावर विद्युत पुरवठा देण्यासाठी ७.५ किमी.ची २२ केव्ही उच्चदाब वीज वाहिनी, २०० केव्हीचे तीन ट्रान्सफॉरमर (रोहित्र), ३.५किमी लघुदाबाची वाहिनी व इतर लघुदाब वितरण वाहिन्या इत्यादी कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. सदर कामासाठी रु.२.५कोटी इतका खर्च आला आले. घारापुरी येथे तीन ट्रान्सफॉरमर (रोहित्र) बसवण्यात आले असून यामध्ये शेतबंदर (अंदाजे अपेक्षित ग्राहक १००), मोराबंदर (अंदाजे अपेक्षित ग्राहक ५०) व राजबंदर (अंदाजे अपेक्षित ग्राहक १००) यांचा समवेश होतो. यापैकी शेतबंदर व मोराबंदर येथील ९६ ग्राहकांनी नवीन वीज जोडणी करता अर्ज व पैसे जमा केले आहेत. या अनुषंगाने विद्युत मीटर बॉक्स लावण्याचे काम सुरु आहे.

 

घारापुरीचे महत्व
युनेस्को मान्यता प्राप्त जागतिक वारसा लाभलेल्या भारतातील १७ सौदर्य स्थळापैकी एलिफंटा लेणी(घारापुरी बेट) हे एक असून येथे दररोज मोठ्या प्रमाणात भारतीय व परदेशी पर्यटक भेट देतात. महाराष्ट्र शासनाने हे वारसा पर्यटक क्षेत्र घोषित केले असून सदर क्षेत्र हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एम.टी.डी.सी.)यांच्या अखत्यारीत आहे.
सदर बेटावर सध्यस्थिती मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत डिझेलद्वारे जनरेशन करून वीज पुरवठा करण्यात येतो. त्याचा खर्च महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यामार्फत करण्यात येतो. सदर बेटामध्ये पारंपारिक पद्धतीने विद्युतीकरण केल्यास स्थायी स्वरुपात वीज पुरवठा उपलब्ध होऊन पर्यटन विकासाच्या दृष्टीकोनातून तो मैलाचा दगड ठरणार आहे.
पूर्वपीठीका
घारापुरी बेटाचे विद्युतीकरण करण्याबाबत उरण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष महेश बालदी यांनी मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांच्याकडे लेखी मागणी केली होती. सदर पत्रावर मा.मुख्यमंत्री यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार राज्य शासनाने घारापुरी बेटाचा विकास करण्यासंबंधीची जबाबदारी ही मुंबई महानगर विकास प्राधिकरण (MMRDA) या संस्थेस सोपवली व त्यांच्या तर्फे महावितरण कंपनीस सदर बेटावर पारंपारिक पद्धतीने वीज पुरवठा करण्यासाठीचे अंदाज पत्रक देण्यासंबंधी कळवले.
त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या भांडुप परिमंडळाने एलिफंटा लेणी विद्युतीकरण करण्याकरता समुद्र तळापासून मरीन केबल तसेच घारापुरी बेटावरील विद्युतीकरणासाठी लागणाऱ्या साहित्याचा रु.२१ करोडचा प्रस्ताव MMRDAकडे पाठवण्यात आला होता, त्यापैकी १८.५ कोटीरु.च्या खर्चास मंजुरी मिळाली होती.
फोटो – १ ) प्रकल्पाचे सादरीकरण पाहताना मा. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रधान सचिव(ऊर्जा) अरविंदसिंह व  महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार२ ) मा. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानताना स्थानिक लोकप्रतिनिधी सोबत प्रधान सचिव(ऊर्जा) अरविंदसिंह व  महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार३) घारापुरी बेटावर पाहणी करताना मा. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे सोबत लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ

Leave a Reply

Your email address will not be published.