घरी उशिरा आलेल्या मुलांसाठी दरवाजा उघडणाऱ्या आईचा वडिलांनी केला खून

(म.विजय)

पुणे – घरी उशिरा आलेल्या मुलांसाठी दरवाजा उघडणे आईला चांगलेच महागात पडले असून, मातृप्रेमाने तिचा बळी घेतला आहे. पुण्यामधील धनकवडी भागात ही घटना घडली असून, मुलांच्या वडिलांनीच आपल्या पत्नीच्या डोक्यात वार करून खून केला. याबाबत भारती विद्यापीठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुलांच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुधा रवी केसरी (वय ४५) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. तर तिचे पती रवी केसरी (वय.५५) यांना अटक करण्यात आली असून, मुलगा संदीप रवी केसरी (वय.२४ सर्व रा. धनकवडी, पुणे) याने भारती विद्यापीठ पोलिसात तक्रार दिली आहे.

केसरी कुटुंब धनकवडी मधील चव्हाण कॉम्प्लेक्स मध्ये पहिल्या मजल्यावर राहण्यास आहेत.बुधवार (दि.२५) सायंकाळी मुलगा संदीप आणि त्यांची मुलगी बाहेर गेले होते. दरम्यान रवि केसरी आणि सुधा केसरी घरात होते. बाहेर गेलेला त्यांचा मुलगा व मुलगी रात्री पावणे नऊच्या सुमारास परत आले. यावेळी त्यांना यायला उशीर झाला आहे, दरवाजा उघडू नको असा आदेश रवी केसरी यांनी आपली पत्नी सुधा हिला दिला. “मात्र मातृप्रेम हे मातृप्रेमच असते, आईने आपल्या लेकरांसाठी दरवाजा उघडला आणि तिथेच घात झाला.”

मुलांना घरात घेतल्याचे पाहताच संतापलेल्या रवी केसरी यांनी पत्नी सुधाच्या डोक्यात टणक वस्तूने प्रहर केला. यावेळी तो एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने सुधा यांचे डोके भिंतीवर आदळून, त्यांना जमिनीवर फेकले. तर मुलांना देखील मारहाण केली. यावेळी बेशुद्ध झालेल्या सुधा यांना रुग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने घोषित केले. यातील आरोपी रवी केसरी हे रिक्षाचालक आहेत.

दरम्यान घटनेचे गांभीर्य पाहता, सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजीराव पवार, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले, गुन्हे शाखेचे राजकुमार वाघचौरे यांनी घटनास्थळी भेट दिली.

Hits: 40

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email