गांधारी पुलावर सिंहाचे दर्शन; भलतीकडचा व्हिडीओ कल्याणच्या नावाने व्हारल।।
म विजय
कल्याणात राहणाऱ्या नागरिकांची सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका जबरदस्त व्हिडिओने झोप उडवली आहे. ‘कल्याणच्या गांधारी पुलावर सिंहाचे दर्शन’ या नावाने एक व्हिडिओ सध्या कल्याणात आणि आसपासच्या परिसरात सोशल मिडियावर धुमाकूळ घालत असून मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओच असा आहे की त्यातील वनराज सिंहाना पाहूनच अनेकांची भंबेरी उडाली आहे. त्यामूळे संध्याकाळपासून एका वेब पोर्टल च्या कार्यालयात या व्हिडीओच्या आणि त्यातील माहितीच्या सत्यतेबाबत विचारणा करणारे अनेक मेसेज -फोन येत आहेत.
सोशल मिडीयावर कधी कोणता व्हिडीओ आणि कोणत्या नावाने व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही. बऱ्याचदा इतर ठिकाणचा व्हिडीओ भलत्याच परिसराच्या नावाने खपवून सोशल मीडियावर व्हायरल होतात. कल्याणात सध्या व्हायरल झालेला हा व्हिडीओदेखील त्याच प्रकारातील आहे.
‘कल्याणच्या गांधारी पुलावर सिंहाचे दर्शन’ या नावाने भलत्याच ठिकाणाचा व्हिडीओ कल्याणात सर्वत्र सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. हा व्हिडीओ जरी दुसरीकडचा असला तरी तो कल्याणच्या गांधारी पुलावरील वाटावा याला कारणीभूत ठरला आहे ते पुलाचे बांधकाम आणि आजूबाजूचा परिसर. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसणारा पूल आणि आजूबाजूचा परिसर हा कल्याणच्या गांधारी पूल तसेच त्याच्या आजूबाजूच्या परिसराशी अगदी मिळता जुळता आहे. पहिल्यांदा हा व्हिडीओ बघणाऱ्या कल्याणातील नागरिकालाही हा व्हिडीओ आपल्याच परिसरातील वाटावा इतके त्यात साम्य आहे. मात्र बारकाईने विचार आणि व्हिडिओची पाहणी केली असता हा व्हिडीओ दुसऱ्या कोणत्या ठिकाणचा असल्याचे लगेच स्पष्ट होते.
कल्याणच्या गांधारी पुलावर दोन्ही बाजूला रस्त्याच्या शेजारी असलेल्या फुटपाथवर छोटे छोटे कठडे बांधण्यात आले आहेत. जे या व्हिडीओमध्ये दिसत नाहीत. तसेच या व्हिडीओत पुलाखालून वाहणारी नदी किंवा पाण्याचा प्रवाह पूर्णपणे आटलेला असून दलदलयुक्त परिसर दिसत आहे. ज्याची गांधारी नदीशी तुलना केली असता गांधारी नदी बारमाही पाण्याने भरलेली असते आणि ओहोटीच्या काळातच नदीच्या कडेला दलदलयुक्त परिसर दिसून येतो.
यावरूनच जरी हा पूल आणि परिसर हुबेहूब कल्याणातील गांधारी पुलासारखा दिसत असला तरी हा व्हिडीओ मात्र दुसऱ्याच ठिकाणचा आहे एवढे मात्र नक्की. त्यामूळे कल्याणातील नागरिकांनी या व्हिडिओपासून घाबरून जाऊ नये. तसेच सोशल मीडियावर आलेले असे व्हिडीओ थोडासा विचार करून पुढे पाठवावे असे आवाहन करावेसे वाटते.