गर्दीच्या काळातील खासगी प्रवासी वाहनांच्या अमर्याद भाडेवाढीवर नियंत्रण

प्रवाशांची होणारी लुबाडणूक थांबणार

मुंबई – गर्दीच्या हंगामाच्या काळात राज्यातील खासगी प्रवासी वाहने (बस, ट्रॅव्हल्स इत्यादी) त्यांच्या तिकीटदरात मोठ्या प्रमाणात अवाजवी वाढ करतात. मोठ्या गर्दीच्या काळात ही वाढ अनेकपट असते. यामुळे प्रवाशांची होणारी लुबाडणूक थांबविण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार खासगी कंत्राटी वाहनांचे भाडेदर निश्चित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यानुसार या खासगी कंत्राटी वाहनांना आता गर्दीच्या हंगामाच्या काळात एसटी महामंडळाच्या बस भाडेदराच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारता येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.

अधिक भाडे आकारणाऱ्या वाहनाचा परवाना रद्द होणार

यासंदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहेत. किंबहूना, या भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारण्यात येत असल्यास मोटार वाहन कायदा / नियमाप्रमाणे संबंधित वाहनाचा परवाना रद्द करण्यात येईल, असे रावते यांनी सांगितले.रावते म्हणाले की, राज्यात प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात खासगी बस, ट्रॅव्हल्स इत्यादी कंत्राटी वाहनांचा वापर करण्यात येतो. गर्दीच्या हंगामामध्ये (उन्हाळी सुट्टी, दिवाळी सुट्टी, गणेशोत्सव, होळी, नाताळ सुट्टी इत्यादी काळामध्ये) या वाहतुकदारांकडून अवाजवी भाडेवाढ करण्यात येते. त्यामुळे या वाहनांचे भाडेदर निश्चित करण्याचे आदेश मा. उच्च न्यायालयाने एका याचिकेत दिले होते. त्यानुसार हे भाडेदर निश्चित करण्यासाठी पुणे येथील केंद्र शासनाच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी) संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती. या संस्थेने खासगी कंत्राटी वाहतुकीच्या विविध वर्गवारीतील सोयी सुविधांचा अभ्यास करुन अहवाल सादर केला. या वाहनांची वर्गवारी प्रमुख्याने वातानुकूलीत (एसी), अवातानुकूलीत (नॉन एसी), शयनशान (स्लिपर), आसनव्यस्थेसह असलेली शयनयान (सेमी स्लिपर) इत्यादी प्रकारात करण्यात आली आहे.

रावते म्हणाले की, या खासगी वाहनांना एसटी महामंडळाच्या बस भाडेदराच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारता येणार आहे. एसटी बसच्या टप्पा वाहतुकीचे भाडेदर हे राज्य परिवहन प्राधिकरणाकडून निश्चित करण्यात येतात. हे भाडेदर विचारात घेऊन खासगी वाहनाच्या संपूर्ण बससाठी प्रति कि.मी. भाडेदर हे त्याच स्वरुपाच्या एसटी महामंडळाच्या संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि.मी. भाडेदराच्या ५० टक्केपेक्षा (दीडपटीपेक्षा) अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या खासगी वाहनांना प्रवाशांकडून त्याच तुलनेत तिकीटदर आकारणे बंधनकारक राहील, असे रावते यांनी सांगितले. या निर्णयामुळे गर्दीच्या हंगामाच्या काळात प्रवाशांची अडवणूक करुन केली जाणारी लुबाडणूक थांबविण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

रावते म्हणाले की, राज्यात उद्यापासून सलग चार दिवस सुट्टी असल्याने खासगी कंत्राटी वाहनांनी आज रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात दर आकारणी केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ज्या मार्गासाठी एरवी साधारण ५०० रुपये तिकीटदर आकारला जातो, त्या मार्गावर आज रात्री प्रवासासाठी साधारण २ हजार रुपये तिकीटदर आकारला जात आहे. खासगी वाहनांची ही मनमानी आणि प्रवाशांची अडवणूक रोखण्याच्या दृष्टीने आजचा शासन निर्णय अत्यंत महत्वाचा आहे. राज्यात त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.