खाजगी सावकारी करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार ; दिवाकर रावते

(म.विजय)

मुंबई – एसटीतील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अगतिकतेचा गैरफायदा घेऊन अनधिकृतपणे खाजगी सावकारी व्यवसाय करणाऱ्या एसटीतील काही तथाकथित अधिकारी / कर्मचाऱ्यावर यापुढे कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निर्देश  परिवहन व खारभूमी विकास मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. दिवाकर रावते यांनी एसटी प्रशासनास दिले होते. त्यानुसार एसटीच्या सुरक्षा व दक्षता विभागामार्फत तातडीने परिपत्रक काढून अशा प्रकारे अवैध पद्धतीने व्याजाने पैसे देणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक एसटी प्रशासनाला दिले आहेत.
एसटी महामंडळात सुमारे १ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी मध्यवर्ती स्वरूपाची एसटी कर्मचारी सहकारी बँक अस्तित्वात आहे. तसेच स्थानिक पातळीवर काही कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन सरकारी पतसंस्थांची स्थापना केली आहे. याबरोबरच एसटीच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनावर आधारित सरकारी व सहकारी बँकातून पतपुरवठा केला जाऊ शकतो. असे असताना कर्मचाऱ्यांच्या अज्ञानाचा व आर्थिक अगतिकतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्यातील काही कर्मचारी व अधिकारी अवैधरित्या खाजगी सावकारीच्या माध्यमातून तब्बल १० ते ३० टक्के प्रती महिना या दराने पैसे व्याजाने देत असल्याबाबत व त्याच्या वसुलीसाठी बेकायदेशीररीत्या या कर्मचाऱ्यांवर दबाव आणत असल्याच्या तक्रारी रावते यांच्याकडे कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या. ग्रामीण व शहरी भागातील एसटीच्या आगारात कर्मचाऱ्यांच्या ‘भीशी ‘ च्या नावाखाली असा छुपा खाजगी सावकारांचा धंदा फोफावला होता. एसटीतील अनेक कर्मचारी अशा खाजगी सावकारीच्या पाशात अडकले होते. काही ठिकाणी या तथाकथित सावकारीच्या अत्याचाराविरुद्ध पोलीस स्थानकात तक्रारी पण दाखल झाल्या होत्या. विशेष म्हणजे प्रशासनाने केलेल्या चौकशी अंती अशाप्रकारे सावकारी करणारे लोक एसटीचे कर्मचारी असल्याचे पुढे आले. काही एसटीचे अधिकारी / पर्यवेक्षक आपल्या अधिकाराचा गैरवापर करून आर्थिकदृष्टया नडलेल्या कर्मचाऱ्यांना व्याजाने पैसे घेण्यास प्रवृत्त करीत, नंतर व्याजासाठी त्यांच्यावर अवैधरित्या दबाव आणत असत. अशा अनधिकृत सावकारांच्या धाक दपटशाहीमुळे संबंधित कर्मचारी त्यांना टाळण्यासाठी व तोंड लपविण्यासाठी आपल्या दैनंदिन कामावर गैरहजर राहू लागले. साहजिकच त्याचा विपरीत परिणाम एसटीच्या कामकाजावर होऊ लागला. असे गैरप्रकार थांबविण्याच्या हेतूने एसटी महामंडळाच्या आवारात बेकायदेशीर व अनधिकृतरित्या व्याजाने पैसे देणे / घेणे बाबतचे व्यवहार करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय दंड संहिता व महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अन्वये दखलपात्र गुन्हा नोंदविण्याचे आदेश मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी मनोज लोहिया यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत. या कारवाईमुळे भविष्यात एसटीच्या सर्वसामान्य कामगारांचे आर्थिक शोषण करणाऱ्या अशा खाजगी सावकारीला लगाम बसेल हे निश्चित.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email