खाजगी सावकारांच्या जाचास कंटाळून तरुणाची आत्महत्या
नेकनूर – खाजगी सावकारांकडून उचललेली रक्कम १० टक्के व्याजाने परत करूनही सावकार जास्तीच्या पैश्याची मागणी करत त्रास देत असल्याने कंटाळलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चाकरवाडी येथे उघडकीस आली. केशव रघुनाथ कवडे (वय ३५, रा. चाकरवाडी) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याने गावातील शहादेव चंद्रसेन माने आणि राजेंद्र मोहन आनवणे या दोन सावकारांकडून दर महिना दहा टक्के दराने कर्ज घेतले होते.
यातील बहुतांशी रक्कम परत करूनही सदरील सावकार अधिक पैश्याची मागणी करत होते. यासाठी केशवला सतत त्रास देण्यात येऊ लागला. या जाचास कंटाळून केशवने दुपारनंतर स्वतःच्या शेतातील आंब्याच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली असे त्याची पत्नी जयश्री हिने दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सदर फिर्यादीवरून दोन्ही सावकारांवर कलम ३०६ आणि सावकारकीच्या कायद्यान्वये नेकनूर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सय्यद करत आहेत.