खड्डे बुजवण्यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे उतरले रस्त्यावर शीळ फाटा, टिळक पुतळा, काटई नाका, बदलापूर रोड जंक्शन, वालधुनी पुल येथील रस्त्यांची दुरुस्ती
ठाणे दि.३० – सततच्या पावसामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या वाहनचालकांना दिलासा देण्यासाठी पावसाची उघडिप मिळताच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वत: रस्त्यावर उतरत खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. बुधवारी रात्रीपासून सुरू झालेली ही खड्डे बुजवण्याची मोहीम शुक्रवारी दिवसभर खा. डॉ. शिंदे यांच्या देखरेखीखाली विविध ठिकाणी सुरू होती. शीळ फाटा, काटई नाका, बदलापूर रोड जंक्शन, मानपाडा जंक्शन, डोंबिवली पूर्व येथील टिळक पुतळा ते मंजुनाथ विद्यालय, कल्याण (पू.) येथील वालधुनी पुल अशा विविध ठिकाणचे खड्डे बुजवण्याचे काम ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली महापालिका आणि एमएसआरडीसी यांच्या माध्यमातून करण्यात आले. तसेच, उल्हासनगर-कल्याण-डोंबिवली यांना जोडणारा शहाड येथील उड्डाणपुल आणि म्हारळपर्यंतच्या रस्त्याच्या कामाचीही पाहाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसह केली.
पाऊस विश्रांती घेत नसल्यामुळे खड्डे बुजवण्याच्या कामी अडथळे येत होते. त्यामुळे वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यातच मुंब्रा बायपास रस्ता बंद असल्यामुळे अन्य मार्गांनी वाहतूक वळवण्यात आल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत होती. त्यामुळे पावसाने उसंत घेताच खा. डॉ. शिंदे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून आपल्या देखरेखीखाली महत्त्वाच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले. ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली महापालिका, तसेच एमएसआरडीसीच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
खा. डॉ. शिंदे यांच्यासह कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर विनिता राणे, ठाणे महापालिकेचे उपमहापौर रमाकांत मढवी, स्थायी समितीचे सभापती राम रेपाळे, नगरसेवक शैलेश पाटील, बालाजी काकडे, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे सभागृह नेते श्रेयस समेळ, ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, दिपेश म्हात्रे आदी उपस्थित होते.
बुधवारी रात्री डोंबिवली पूर् येथील टिळक पुतळा ते मंजुनाथ विद्यालय या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. खा. डॉ. शिंदे यांनी स्वतः रात्री दीड वाजेपर्यंत उपस्थित राहून आपल्या देखरेखीखाली काम करून घेतले. रात्रभरात या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण करण्यात आले.
गुरुवारी सकाळी शीळ फाटा येथील विस्तीर्ण चौकातील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले. जेएनपीटी, तळोजा एमआयडीसी, तसेच नाशिक आणि अहमदाबाद या दिशांकडून येणारी वाहने शीळ फाटा मार्गेच जात असल्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या चौकातले खड्डे बुजवण्यात आले. त्यानंतर काटई नाका, बदलापूर रोड जंक्शन, वालधुनी पुल येथील खड्डेही बुजवण्यात आले. शुक्रवारी पत्रीपूल, गोविंदवाडी बायपास ते भिवंडी फाट्यापर्यंतच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात येणार आहेत.
पावसाने आता बऱ्यापैकी उघडिप घेतल्यासारखे चित्र असल्यामुळे या कामांमुळे वाहनचालकांना आणि रहिवाशांना दिलासा मिळेल, असा विश्वास खा. डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांसह त्यांनी शहाड पूल, तसेच म्हारळपर्यंतच्या रस्त्याच्या कामाचाही पाहाणी केली.