क्षुल्लक कारणावरून पोलिसाची वर्दी फाडली
बीड – रात्रीच्या सुमारास बस स्थानकात झोपलेल्या व्यक्तीकडे पोलिसांनी चौकशी केल्याच्य रागातून त्याने पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून त्यांची वर्दी फाडल्याची घटना बीड बस स्थानकात रात्री घडली.शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक जयसिंह गायकवाड आणि त्यांचे सहकारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास बीड बस स्थानकात अनधिकृतपणे थांबलेल्या व्यक्तींकडे चौकशी करत होते.यावेळी त्यांना संजय विठ्ठल मुंडे (रा. हिंगणी खु., ता. बीड) हा बस स्थानकात झोपलेला आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडे कुठून आलास आणि इथे का झोपलास अशी चौकशी केली. याचा राग येऊन संजय मुंडे याने मला विचारणारे तुम्ही कोण असे म्हणत पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली आणि झोम्बाझोम्बी करून शर्टचा खिसा फाडला.याप्रकरणी पो.ना. जयसिंह गायकवाड यांच्या फिर्यादीवरून संजय मुंडे याच्यावर कलम ३५३, ३२३, ५०४, ३४ अन्वये शिवाजीनगर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास हवालदार राठोड हे करत आहेत.