कोल्हापूर महोत्सव प्रथमच मुंबईमध्ये

( म विजय )

मुंबईमध्ये आतापर्यंत कोकण महोत्सव, मालवणी जत्रा आणि मिसळ महोत्सवाचे आयोजन अनेक संस्था, राजकीय पुढारी करत आले आहे. परंतु आता मुंबईमध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणावर कोल्हापूर महोत्सवाची तयारी सुरू आहे. आराध्य फाउंडेशन या संस्थेमार्फत आतापर्यंत अनेक मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मिसळ महोत्सवात प्रामुख्याने वेगवेगळ्या जिल्ह्यातील,तालुक्यातील मिसळ व्यावसायिकांना संधी उपलब्ध करून देण्याचं काम आराध्य फाऊंडेशनने उत्तमरित्या पार पाडले आहे. उत्कृष्ट मार्केटिंग कला, बसण्यासाठी व्यवस्थित जागा, टापटीपपणा, सुरक्षारक्षकांचे कवच, नियोजनबद्ध आयोजन, उत्कृष्ट निवेदन, कार्यकर्त्यांची फौज या सर्व गोष्टींच्या जोरावर आराध्य फाउंडेशन आतापर्यंत सर्व मिसळ महोत्सवात स्वतःचा ठसा उमटविला आहे.

आराध्य फाउंडेशन तर्फे मुंबईकरांसाठी आगळा वेगळा असा कोल्हापूर महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. कोल्हापूर मध्ये ज्यांच काही काळ वास्तव्य होते, ज्यांनी कोल्हापूर जवळून पाहिले आहे व आता काही कामानिमित्त मुंबईत स्थायिक झाली आहे अशा सर्व कोल्हापूर, सातारा, सांगली, कराड व मुंबईकरांसाठी सुद्धा हा महोत्सव जवळचा वाटणार आहे.कोल्हापुरी जेवण म्हणजे फक्त झणझणीत तिखट असे नव्हे तर कोल्हापुरी जेवण ही एक परंपरा आहे, ही एक पद्धत आहे. विशिष्ट मसाले वापरून विशिष्ट पद्धतीने बनवलेले स्वादिष्ट जेवण म्हणजे कोल्हापुरी जेवण.

मुंबईमधल्या तमाम रसिक खवय्यांना आता चमचमीत कोल्हापुरी मांसाहारी व शाकाहारी जेवण्यासाठी किंवा कोल्हापुरी मिसळ खाण्यासाठी कोल्हापूरला जाण्याची गरज नाही. 17 मे ते 19 मे या दिवशी कोल्हापूर मधल्या चवदार तांबडा पांढरा रस्सा, नाद खुळा चवीचे मस्त मटन, चिकन, वडा कोंबडा, मटन लोणचे, रक्ती मुंडी, कोल्हापुरी बिर्याणी, अस्सल चटकदार मिसळ, पिठलं भाकर, खर्डा, भेळ, भडंग आणि इतर अनेक कोल्हापुरी पदार्थ आता चक्क माहिम, मोगल लेन मधल्या लोकमान्य ज्युनिअर कॉलेजच्या मैदानातच उपलब्ध होणार आहे. तीच चव, तोच मसाला, तीच पद्धत आणि तेही आपल्या कोल्हापूर मधल्याच लोकांकडून.

या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे अस्सल कोल्हापूरकरांनी हे खाद्यपदार्थ व वस्तूंचे स्टॉल लावलेली आहेत. कोल्हापूरच्या बचत गटाच्या महिलांनी व उद्योजकांनी बनविलेल्या अस्सल कोल्हापुरच्या ग्रामीण खाद्यपदार्थांची मेजवानी तसेच कोल्हापूरच्या बाजारपेठेत मिळणारे सर्वच वस्तूंचे प्रदर्शन या महोत्सवात मुंबईकरांना अनुभवण्यास मिळणार आहे. सुप्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल, गुळ, साज,ठुशी, मिरची, मसाले, काकवी, आजरा तांदूळ, साड्या, चिरमुरे, पापड,कुरड्या, सांडगे यांचे स्टॉल लावण्यासाठी खास कोल्हापूर वरून कोल्हापुर च्या व्यावसायिकांना बोलावण्यात आलेले आहे.वार्षिक परीक्षा संपल्यामुळे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बच्चेकंपनीसाठी बाल नगरी उभारण्यात आलेले आहे.

अनेक मराठी,हिंदी चित्रपट अभिनेते, अभिनेत्री, खेळाडू, राजकारणी व विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती या महोत्सवास भेट देणार आहेत.

एकूणच हा कोल्हापूर महोत्सव मुंबईकरांना कुटुंबीयांसमवेत व मित्रमंडळी समवेत आनंद घेण्यासाठी पर्वणी ठरेल. चला तर मग कोल्हापूर महोत्सवाचा फक्कड बेत बनवा.

कोल्हापूर महोत्सव

ठिकाण – लोकमान्य ज्युनिअर कॉलेज मागील ग्राउंड, मोगल लेन, माहीम

तारीख आणि वेळ-
17/18 मे- संध्या. 4 ते रात्री 10
19 मे – दुपारी 12 ते रात्री 10

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email