कोराडी मंदिरात २०० वर्षांपासूनची बळी देण्याची परंपरा बंद
नागपूर – कोराडी येथील आई जगदंबेच्या मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव अतिशय उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. मात्र, या मंदिरात २०० वर्षांपासूनची बळी देण्याची परंपरा बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शनिवारी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाने घेतला आहे.
यंदाच्या नवरात्रपासून कोराडी मंदिराच्या ३४ हेक्टर (८५ एकर) परिसरात कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांचा बळी देण्याच्या प्रथेवर पूर्णपणे बंदी आणली जाणार आहे. बळी बंदीचा हा महत्वपूर्ण निर्णय नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा देवी संस्थानने घेतला आहे. नवरात्र काळात दर्शनाला येणारे अनेक भाविक मंदिर परिसरात एखाद्या प्राण्याचा बळी देतात.
मात्र, या वर्षीपासून ही परंपरा खंडीत करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. यासह मंदिर परिसरात यापुढे मांसाहार, धूम्रपानवरही पूर्णपणे बंदी आणली जाणार आहे. एवढेच नाही तर या संपूर्ण परिसरात भाविकांना स्वयंपाक बनवण्यासही बंदी आणली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
देवीच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांना डबा आणण्याची आणि त्यामध्ये फक्त शाकाहारी जेवण आणण्याची अनुमती राहील, अशी माहिती संस्थानचे विश्वस्त आणि मार्गदर्शक चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.