कोथरुड मध्ये रंगलेल्या हुक्का नाईट’ला पत्रकारांचा दणका ; दोन जण गजाआड

(म.विजय)

पुणे – पौड रस्त्यावरील कोथरूड डेपो जवळ असलेल्या रॉयल बाबाज गार्डन या ठिकाणी चालणाऱ्या अवैध हुक्का पार्लर’चा ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन’च्या पत्रकारांनी पर्दाफाश केला असून, दोघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. या ठिकाणी अवैद्यरित्या हुक्का आणि मद्य पुरवले जात असल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर विवस्त्रावस्थेत तरुण तरुणी नशेत धुंद झालेले होते. सदरील प्रकार पौड रस्त्यावर असलेल्या एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर सुरु होता.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सर्फराज अजगरअली अन्सारी आणि एजाझ  काझी यांच्यावर तंबाखू जन्य पदार्थ कायदा (कोपटा), नुसार गुन्हा दाखल केल्याचे कोथरूड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर खटके, पोलीस उपनिरीक्षक शाम शिर्के यांनी सांगितले.

प्रेझेंटिंग निऑन नाईट या नावाने सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या पोस्टची दखल घेऊन ऑनलाईन न्यूज पोर्टल चालविणाऱ्या काही पत्रकारांनी दै.सकाळ’चे जितेंद्र मैड, दै. पुढारी’चे दीपक पाटील, प्रेस ९ राकेश वाघमारे, सी २४ तासचे तुकाराम गोडसे आणि कोथरूड पोलिसांना बरोबर घेत आज रविवार (दि.११) पहाटे अडीच वाजता रॉयल बाबाज गार्डन’वर धाड टाकली. यामध्ये ५० ते ६० हुक्का फ्लेवरचे मोकळे डबे, ५५ फिल्टर, २५ हुक्का पॉट आणि पाईप आढळून आले.

याबाबत बोलताना ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन’चे संपर्क प्रमुख सागर बोदगिरे यांनी सांगितले की, आम्हाला सोशल मिडीयाच्या माध्यमातून आलेल्या पोस्टवरून याबाबत माहिती मिळाली होती. तिथे ९९ रुपयांत हुक्का पुरवण्याचे म्हटले होते. याबाबत खातरजमा केली असता, कोथरूड पोलीस स्टेशन आणि एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर अवैद्यरित्या हा गोरखधंदा सुरु असल्याचे समोर आले. यानंतर पोलीस नियंत्रण कक्ष आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर खटके यांना संपर्क साधून कळवले असता, त्यांच्या पथकाने ‘बाबाज गार्डन’वर धाड टाकली.

दरम्यान, घडलेल्या नाट्यमय घडामोडीत पोलीस येईपर्यंत अनेक तरूण तरूणी पळून जाण्यात यशस्वी झाले. तर काही अति झिंगलेली जोडपी मात्र पोलीस आल्यानंतर देखील तिथे होती. पोलिसांना पाहताच त्यांची नशा उतरली, अशांची नावे लिहून घेत, त्यांना सोडून देण्यात आले. तर तेथील दहा पंधरा कर्मचार्‍यांनी हुक्का, अंमली पदार्थ यांची विल्हेवाट लावली होती. यावेळी पत्रकारांनी रितसर पंचनामा करण्याचा आग्रह धरल्याने पोलिसांनी या अवैध हॉटेल व हुक्का पार्लरची पाहणी करत, कारवाई केली.

हॉटेल बाबत सांगताना, सागर बोद्गीरे म्हणाले, सदरील बाबाज गार्डन’चे प्रवेश व्दार अरुंद असून अंधार होता, त्यातून आत गेल्यावर मोकळ्या जागेत दर्शनी भागाला चहा व स्नॅक्सची टपरी होती. मुख्य इमारतीच्या आत प्रवेश केला की उजव्या बाजूला डान्स फ्लोअर आढळला, तर डाव्या बाजूला जीन्याने वर गेले की हुक्का बार व इतर गैरप्रकार करण्याची जागा आढळून आली. तिथे छोट्या छोट्या खोल्या आणि त्यात चहू बाजूनी गाद्या टाकून, मध्ये हुक्का टेबल ठेवलेला आढळला.तर धुरामध्ये गांजा सदृश दर्प येत असल्याचे जाणवत होते.

याबाबत नागरी सुरक्षा समितीचे संदिप कुंबरे म्हणाले की, २४ जानेवारी रोजी येथे लेडीज डान्स नाईट होत आहे, याची खबर पोलिसांना दिली होती. पण त्याची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही. जवळच पोलीस स्टेशन आणि मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यालय असलेल्या भागात अशा घटना घडत असतील तर गुन्हेगारांवर वचक तरी कसा बसेल, असा सवाल कुंबरे यांनी उपस्थित केला.

एकूणच तरुणाईला वाईट वळणावर घेऊन जाण्याचे अनेक प्रकार स्मार्ट पुण्यात, स्मार्ट पद्धतीने सुरु झाले आहेत. मात्र त्यावर स्मार्ट पोलिसांचे लक्ष असून, पोलीस अशा गैरकृत्य करणारांची गय करणार नाहीत असे मत पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर खटके यांनी व्यक्त केले आहे. तर स्मार्ट पद्धतीने काळे धंदे करणाऱ्यांवर स्मार्ट मध्यम म्हणून ओळख मिळवत असलेल्या ऑनलाईन माध्यमांची देखील तेवढीच नजर असल्याचे ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन’चे संपर्क प्रमुख सागर बोदगिरे यांनी सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email