कोकणातल्या हापूस आंब्याला जीआय टॅग
नवी दिल्ली, दि.०५ – महाराष्ट्रातल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि आसपासच्या परिसरातल्या हापूस आंब्याला भौगोलिक संकेतक म्हणजे जीआय टॅग मिळाला आहे. विशिष्ट भौगोलिक प्रदेशातली उत्पत्ती आणि त्यामुळे विशिष्ट गुणधर्म आणि लौकिक प्राप्त झालेल्या उत्पादनांना जीआय टॅग दिला जातो. यामुळे दर्जा आणि त्या भौगोलिक प्रदेशामुळे निर्माण झालेले वैशिष्ट्य यांची खात्री प्राप्त होते.
दार्जीलिंग चहा, महाबळेश्वर स्ट्रॉबेरी, बनारसी साडी, तिरुपती लाडू यांना जीआय टॅग प्राप्त झाला आहे.
आंब्याचा राजा असलेला अल्फान्सो, महाराष्ट्रात हापूस म्हणून ओळखला जातो. या आंब्याच्या अद्वितीय चवीमुळे आणि त्याचा दरवळ आणि रंगामुळेही स्थानिक बाजारपेठांबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही त्याला मोठी मागणी आहे. जगातलं सर्वात लोकप्रिय फळ असलेला हा हापूस जपान, कोरिया, युरोपसह विविध देशात निर्यात केला जातो. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या नव्या बाजारपेठाही आता हापुससाठी प्राप्त झाल्या आहेत.
2004 मध्ये दार्जीलिंग चहा या उत्पादनातला देशातला पहिला जीआय टॅग मिळाला. भारतात जीआय टॅग मिळालेली एकूण 325 उत्पादने आहेत.
शेतकरी, विणकर, कारागीर यांना उत्पन्नाची जोड मिळून दुर्गम भागातल्या ग्रामीण अर्थव्यवस्थांना जीआय उत्पादनामुळे लाभ होऊ शकतो.
पारंपारिक पद्धतीद्वारे आपल्या ग्रामीण कारागीरांकडे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आगळे कौशल्य आणि कला येत असते, त्याला प्रोत्साहन देऊन या कलांचे जतनही आवश्यक आहे.