केंद्रीय रसायने आणि खते आणि संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांच्या निधनाबद्दल मंत्रिमंडळाकडून शोक व्यक्त
केंद्रीय रसायने आणि रस्ते आणि संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांचे 12 नोव्हेंबर 2018 रोजी बंगळुरू येथे निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाने तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. अनंत कुमार यांच्या निधनाने देशाने एक अनुभवी नेता गमावला आहे असे मंत्रिमंडळाने विशेष मंत्रिमंडळ बैठकीत पारित केलेल्या ठरावात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यात सरकारच्या तसेच संपूर्ण देशाच्या वतीने अनंत कुमार यांच्या कुटुंबियांप्रती शोक संवेदना व्यक्त करण्यात आल्या.
त्यांच्या स्मरणार्थ मंत्रिमंडळाने दोन मिनिटे शांतता पाळली आणि शोक प्रस्ताव मंजूर केला. शोक प्रस्तावाचा मसुदा पुढीलप्रमाणे –
‘अनंत कुमार यांचा जन्म बंगळुरू येथे 22 जुलै 1959 रोजी झाला. त्यांनी हुबळीच्या कर्नाटक विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदवी शिक्षण पूर्ण केले तर कर्नाटक विद्यापीठाच्या जेएसएस विधी महाविद्यालयातून एलएलबी पदवी प्राप्त केली. त्यांनी विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून सामाजिक सेवेला प्रारंभ केला. त्यानंतर ते भाजपाचे सदस्य बनले आणि पक्षाच्या कर्नाटक प्रदेशाचे संघटक सचिव होते. त्यानंतर ते कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष बनले. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली भाजपाने कर्नाटकमध्ये पक्षाचा विस्तार केला आणि कालांतराने आपले सरकार स्थापन केले. ते पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि संसदीय मंडळाचे सदस्य सचिव होते. पक्षाच्या प्रमुख धोरणकर्त्यांपैकी ते एक होते.
हेही वाचा :- पंतप्रधानांनी त्यांच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन सल्लागार परिषदेच्या सदस्यांशी साधला संवाद
1996 मध्ये प्रथमच ते दक्षिण बंगळुरूतून लोकसभेवर निवडून गेले. 1998 मध्ये खासदार असताना ते वाजपेयींच्या मंत्रिमंडळातले सर्वात तरुण मंत्री बनले. नागरी उड्डाण मंत्रीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी सहा वेळा प्रतिष्ठेचा दक्षिण बंगळुरू लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले.
आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी पर्यटन, सांस्कृतिक, युवा कल्याण आणि क्रीडा, नगर विकास आणि दारिद्रय निर्मूलन, ग्रामीण विकास खात्यांचे केंद्रीय मंत्रीपद भूषवले होते. अनेक संसदीय समित्यांचे ते अध्यक्ष आणि सदस्य होते.
अनंतकुमार सक्रीय सामाजिक कार्यकर्ते होते. सरकारच्या सहाय्याने गरीब शाळकरी मुलांना पौष्टिक माध्यान्ह भोजन पुरवणे, बंगळुरूच्या झोपडपट्ट्यांमधील विविध शाळांमध्ये शैक्षणिक उपकरणांनी युक्त अशी फिरती सेवा उपलब्ध करून देणे, पेयजल आणि अन्य सुविधा तसेच वंचितांसाठी विशेषत: मुली आणि महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यासाठी सरकारी शाळांना दत्तक घेणे अशा प्रकारचे उपक्रम त्यांनी आपल्या स्वयंसेवी संस्थेमार्फत राबवले. त्यांनी ‘हरित बंगळुरू’ उपक्रमाचा प्रारंभ केला, ज्याचे उद्दिष्ट झाडे आणि व्यक्ती यांचे गुणोत्तर एकास एक पर्यंत वाढवणे हे आहे. या उपक्रमाअंतर्गत नियमितपणे वृक्ष लागवड आणि त्यांची जोपासना केली जाते.
विविध पदे भूषवताना अनंत कुमार यांनी केलेल्या देशसेवेची मंत्रिमंडळाने प्रशंसा केली. तसेच त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. त्यांच्या अकाली निधनाने देशाने एक अनुभवी नेता गमावला आहे. संपूर्ण देशाच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांप्रती मंत्रिमंडळाने शोकसंवेदना व्यक्त केल्या.’