कुत्र्याचा चावा : मालकाला सहा हजार रुपये दंड

सांगली – कुत्रे चावल्याबद्दल कुत्र्याच्या मालकाला ६ हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. डी. जवळगेकर यांनी सुनावली. सरकारपक्षातर्फे ऍड. एस. एम. पखाली यांनी काम पाहिले.

खटल्याची पार्श्‍वभूमी अशी, दिनांक १० एप्रिल २०१५ रोजी सकाळी साडेनऊ वाजता भीमाशंकर हणमंतराव तारापुरे (रा. ७ वी गल्ली, विनायकनगर, सांगली) हे सायकलवरुन बँकेकडे चालले होते. त्यावेळी वारणाली रस्त्याने जात असताना त्यांच्या पायाचा कुत्र्याने चावा घेतला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या पाठोपाठ येणार्‍या अन्य चौघांना देखील याच कुत्र्याने चावा घेतल्याने ते चौघेजण जखमी झाले. याबाबत तारापुरे यांनी कुत्र्याच्या मालकाला जाब विचारला. त्यावेळी त्यांना कुत्र्याच्या मालकाने उद्धटपणाने उत्तर दिले. याप्रकरणी तारापुरे यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी कुत्र्याचे मालक विठ्ठल महादेव साखरे (वय ४३) व गोविंद महादेव साखरे (वय ४१ दोघे रा. विनायकनगर, सांगली) यांच्यावर गुन्हा दाखल केला.

या खटल्यात एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारपक्षाला हवालदार फिरोज हुजरे व संदीप मोरे यांनी मदत केली. न्यायालयाने दोघांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली. भा. द. वि कलम २८९, ३२३ व ५०४ अन्वये शिक्षा सुनावली. कलम २८९ अन्वये १ हजार रुपये व ३२३ अन्वये ५ हजार रुपये तसेच ५०४ अन्वये १ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदेच्या शिक्षेचा आदेश न्यायालयाने दिला. दंडाच्या रकमेपैकी ४ हजार रुपये फिर्यादी भीमाशंकर तारापुरे यांना देण्याचे आदेशही दिले. पाळीव प्राण्यापासून कोणास धोका होणार नाही याची योग्य ती काळजी घेणे प्राण्याच्या मालकाची असल्याचे मत न्यायाधीश जवळगेकर यांनी नोंदविले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email