कामोठे येथे २ लाख ६९ हजार १३८ रुपयांचा गुटखा जप्त
नवी मुंबई खंडणी विरोधी पथक व अन्न औषध प्रशासन रायगड यांची संयुक्त कारवाई
पनवेल – पनवेल तालुक्यातील कामोठे गाव येथे नवी मुंबई खंडणी विरोधी पथक व अन्न औषध प्रशासन रायगड यांच्या यांनी संयुक्तपणे कारवाई करून गुटखा जप्त केला व येथील गोडावून जप्त केले. कामोठे येथे ओमकार रामसंजीवन गुप्ता (वय: २१) हा आपल्या राहत्या घरी साई प्रतिष्ठान सह्याद्री हौसिंग सोसायटी सेक्टर १० कामोठे येथे गुटखा विकत असल्याची खात्री पटली होती यानुसार त्याच्या राहत्या घरी छापा टाकल्यानंतर त्याठिकाणी गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू आदीचा साठा आढळला. याबाबत रायगड अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी सु. ना. जगताप यांनी गुप्ता याच्याकडे अधिक चौकशी केली असता हा साठा त्याच्या मालकीचा असून विक्रीकरिता मी माझ्या राहत्या घरामध्ये साठवत आहे असे त्याने यावेळी कबुल केले. या कारवाईमध्ये रजनीगंधा फ्लेवर्ड पानमसाला, केसरयुक्त विमल, व्ही.एल. टोब्यको, राज कोल्हापुरी, तुलसी रॉयल जाफरानी दर्जा या प्रकारचा २ लाख ६९ हजार १३८ रुपयांचा माल हस्तगत करून साठवण केलेले घर सीलबंद केले. ओंकार गुप्ता हा कामोठा, तळोजा, खांदा वसाहत, कळंबोली याठिकाणी गुटखा वितरीत करणारा होलसेलर म्हणून प्रसिद्ध आहे. नुकतीच दीड महिन्यांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाने त्याच्यावर गुटखा विकत असल्यामुळे कारवाई केली होती मात्र त्यानंतरही तो सर्रासपणे गुटखा विकत असल्याने अखेर त्यांच्यावर पुन्हा कारवाई करून त्याचे घर सील करण्यात आले. दरम्यान खंडणी विरोधी पथक व अन्न औषध प्रशासन रायगड यांचे या कारवाईचे परिसरातील नागरीकांकडून स्वागत होत असून गुटखा विक्री करणाऱ्याचे मात्र धाबे दणाणले आहेत. खंडणी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस.टी. तायडे, पोलीस नाईक सूर्यभान जाधव, राजेश सोनावणे, अन्न सुरक्षा अधिकारी सु.ना.जगताप, व श्री. बा.औ. शिंदे यांनी हि कारवाई यशस्वी केली.