काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची ‘जम्बो समिती’
नवी दिल्ली दि.२० – दीर्घ प्रतीक्षेनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या सर्वोच्च ‘काँग्रेस कार्यसमिती’ची घोषणा केली असून यात २३ ज्येष्ठ नेत्यांना सहभागी करून घेण्यात आले आहे. याशिवाय १८ स्थायी सदस्य, १० विशेष निमंत्रितांचा समावेश आहे. काँग्रेसच्या इतिहासात प्रथमच जम्बो कार्यसमिती स्थापन करण्यात आली आहे. यात १० युवा नेत्यांना प्रथमच कार्यसमितीत स्थान देण्यात आले आहे. २३ सदस्यांच्या या कार्यसमिती सदस्यांत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह सोनिया गांधी, मनमोहन सिंग, मोतीलाल व्होरा, गुलामनबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, ए.के. एंटोनी, अहमद पटेल, अंबिका सोनी, ओमान चंडी, तरुण गोगोई, सिद्धरामय्या, आनंद शर्मा, हरीश रावत, सैलजा, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, के.सी. वेणुगोपाल, दीपक बाबरिया, टी. साहू, रघुवीर मीना, गईखंमग, अशोक गेहलोत यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून पाच जणांना यात स्थान देण्यात आले असून मुकुल वासनिक, अविनाश पांडे, बाळासाहेब थोरात, रजनी पाटील आणि राजीव सातव यांची नावे आहेत.
स्थायी निमंत्रित सदस्यांत शीला दीक्षित, पी. चिदंबरम, ज्योतिरादित्य शिंदे, बाळासाहेब थोरात, तारीक हमीद कर्रा, पी.सी. चाको, जितेंद्र सिंह, आर.पी.एन. सिंह, पी.एल. पुनिया, रणदीप सुरजेवाला, आशाकुमारी, रजनी पाटील, रामचंद खुंटिया, अनुराग नारायण सिंह, राजीव सातव, शक्तिसिंह गोहिल, गौरव गोगोई, ए. चेल्ला कुमार यांच्या नावांचा समावेश आहे. विशेष निमंत्रित सदस्य के.एच. मुन्नीयप्पा, अरुण यादव, दीपेंद्र हुड्डा, जितीन प्रसाद, कुलदीप विश्नोई यांच्याशिवाय सेवा दलप्रमुखांचा यात समावेश आहे.
सुशीलकुमार शिंदे, जनार्दन द्विवेदी, कमलनाथ, मोहन प्रकाश, सी.पी. जोशी यांना बाहेर ठेवण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतला आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांना कार्यसमितीत सहभागी करून घेण्यासोबतच महासचिव पद देऊन आसाम राज्याचे प्रभारी करण्यात आले आहे.