कळवा, विटावा, खारेगाव परिसरात मार्च २०१८ पासून घरगुती गॅसचा पुरवठा

( श्रीराम कंदु )

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

ठाणे – घरगुती गॅससाठीची कळवा-खारेगाव-विटावावासीयांची प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार असून कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे मार्च २०१८ पासून येथील रहिवाशांना घरगुती गॅसचा पुरवठा सुरू होणार आहे. या प्रकल्पातील अडथळे दूर करण्यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे सातत्याने करत असलेल्या प्रयत्नांना यश आले असून शास्त्रीनगर, मनिषानगर येथे पहिल्या टप्प्यात पाईप गॅसद्वारे पुरवठा सुरूही करण्यात आला आहे.

या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी खा. डॉ. शिंदे यांनी बुधवारी महानगर गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत प्रकल्पासमोरील अडचणींबाबतही चर्चा करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील गॅस पुरवठा सुरू झाल्याबद्दल खा. डॉ. शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, मार्च २०१८ पासून विटावा, खारेगाव या परिसरासह कळव्याच्या उर्वरित भागांमध्येही पाईपद्वारे गॅस पुरवठा सुरू करण्याचे निर्देश दिले.

पुढील काळात येणाऱ्या अडचणी जमेस धरून सदर कामाचे वेळापत्रक महानगर गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सादर केले. डोंबिवलीमध्ये पाईपद्वारे गॅस पुरवण्याच्या प्रकल्पात अडचणी निर्माण झाल्या असता खा. डॉ. शिंदे यांच्या पुढाकारामुळे या अडचणी दूर होऊन तो प्रकल्प मार्गी लागला. परिणामी आज डोंबिवलीत अनेक भागामध्ये पाईपद्वारे गॅस मिळत असून सीएनजी पेट्रोलपंपही सुरू झाल्यामुळे रिक्षा आणि वाहनधारकांना दूर अंतरावर जाऊन सीएनजी भरण्याचा त्रास वाचला आहे. कळव्यात देखील ज्या काही अडचणी येतील, त्या सोडवण्याची ग्वाही खा. डॉ. शिंदे यांनी देत कुठल्याही परिस्थितीत वेळापत्रकानुसारच काम पूर्ण झाले पाहिजे, असे संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानुसार सदर कामे मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे अश्वासन महानगर गॅस कंपनीचे व्यवस्थापकीय उपसंचालक श्री. मूर्ती यांनी दिले. सदर बैठकीत खा. डॉ. शिंदे यांच्यासह कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, मंदार केणी, महानगर गॅस कंपनीचे व्यवस्थापकीय उपसंचालक श्री. मूर्ती, मुख्य व्यवस्थापक संतोष सामंत, वरिष्ठ व्यवस्थापक (ठाणे) श्री. सचिन परदेशी आदी अधिकारी उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email