कल्याण स्थानकाला विस्ताराचे वेध,रुळांचे काम झाल्यानंतर स्थानकातील फलाटांची संख्याही वाढवणार
९६० कोटींचा निधी मंजूर; पहिल्या टप्प्यात मार्गिका स्वतंत्र करणार
कल्याण : मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे जंक्शन असलेल्या कल्याण रेल्वे स्थानकाच्या विस्ताराला अखेर रेल्वे प्रशासनाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला असून या कामासाठी ९६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. टप्प्याटप्प्यांत विस्ताराची योजना राबवण्यात येणार असून त्यात कल्याण स्थानकातून निघणाऱ्या मार्गिका स्वतंत्र करण्याचे काम सर्वप्रथम केले जाणार आहे. त्यामुळे कर्जत, कसारा येथे जाणाऱ्या गाडय़ांचा वेग वाढणार आहे.
कल्याण रेल्वे स्थानकात सद्य:स्थितीत दिवसाला सुमारे ७५० ते ८०० गाडय़ांना थांबा मिळतो. उत्तर पूर्व दिशेला असलेले कसारा आणि दक्षिण पूर्व दिशेला असलेले कर्जत हे मार्ग कल्याण रेल्वे स्थानकाच्या पुढे वेगळे होतात. मात्र या मार्गाचे रेल्वे रूळ संलग्न असल्याने येथील सिग्नलवर अनेकदा गाडय़ा खोळंबतात आणि एकूणच रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत होते. हा अडथळा कल्याण स्थानकाच्या विस्तार योजनेत सर्वप्रथम दूर केला जाणार आहे. ‘क्रॉस ओव्हर’ म्हणजे एकमेकांत गुंतलेल्या रुळांमुळे या ठिकाणी रेल्वे गाडय़ांचा वेग ताशी १५ किमी इतका खाली घसरत होता. मात्र हे रूळ आता स्वतंत्र करण्यात येणार असून त्यामुळे सध्याच्या दुप्पट वेगाने रेल्वेगाडय़ा येथून मार्गक्रमण करतील. यामुळे रेल्वेगाडय़ांच्या वेळेत होणारी दिरंगाई टळेल, असा विश्वास मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांनी व्यक्त केला.
रुळांचे काम झाल्यानंतर कल्याण स्थानकातील फलाटांची संख्याही वाढवण्यात येईल. या स्थानकात एकूण सात फलाट असून यामध्ये पुढील काळात चार अधिक फलाटांची भर पडेल, अशा पद्धतीचा आराखडा आखण्यात आला आहे. त्यामुळे सध्या फलाट क्रमांक चारवर येणाऱ्या कर्जत, खोपोली मार्गाच्या लोकल गाडय़ा आणि येथे थांबा मिळणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांमुळे फलाटावर होणाऱ्या गर्दीमधून प्रवाशांची सुटका होणार आहे, असा रेल्वे प्रशासनाचा दावा आहे.
अडथळामुक्त प्रवास
रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ४ आणि ५ वर येणाऱ्या रेल्वेगाडय़ांमुळे फलाट क्रमांक २ आणि ३ वर येणाऱ्या रेल्वेगाडय़ांच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण होत आहे. रेल्वे रुळांची बांधणी एकमेकांमध्ये गुंतलेली असल्याने अनेकदा गाडय़ांचे वेळापत्रक खोळंबते. मात्र रूळ वेगळे करण्यात आल्यानंतर तसेच फलाटांची संख्या वाढवल्यानंतर प्रवाशांना खूप फायदा होईल, असा विश्वास कल्याण- कसारा- कर्जत प्रवासी संघटनेचे महासचिव श्याम उबाळे यांनी व्यक्त केला.
कल्याण रेल्वे स्थानकामधून कर्जत आणि कसारा असे गाडय़ांचे दोन मार्ग वेगळे होतात. येथील गुंतागुंतीच्या रेल्वे रुळांमुळे गाडय़ांच्या वेळेत विलंब होतो. क्रॉस ओव्हरच्या कामामुळे सध्या गाडय़ांच्या वेळापत्रकात होणारा विलंब आटोक्यात येईल आणि गाडय़ा वेळेत धावतील.