कल्याण डोंबिवली महापालिकेच्या “ट्रान्सपोर्ट हब” ला एस.टी. महामंडळाची मान्यता…!
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सीटी अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या “ट्रान्सपोर्ट हब” ला एस.टी. महामंडळाची तत्वत: मान्यता…!
मुंबई – कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या एकत्रित वाहतूक व्यवस्थापन केंद्राला (ट्रान्सपोर्ट हब) एस.टी. महामंडळाची तत्वत: मान्यता देण्यात आल्याची घोषणा मंत्री परिवहन, खारभूमी विकास व एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. ते सह्याद्री अतिथीगृहावर बोलवलेल्या एस.टी. महामंडळ व कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीमध्ये बोलत होते.
स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने रेल्वे एस.टी. व शहरी बस वाहतूक यांचे एकत्रित वाहतूक व्यवस्थापन केंद्र (ट्रान्सपोर्ट हब) उभारण्यात येणार आहे. त्यासाठी एस.टी. महामंडळ, रेल्वे व महानगरपालिकेच्या अखत्यारितील जागेच्या वापर करुन सर्व सोईनीयुक्त असे प्रवासी सेवेचे वाहतूक केंद्र निर्माण करण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रकल्पाचे सादरीकरण आजच्या बैठकीमध्ये करण्यात आले. या सादरीकरणाबाबत एस.टी. महामंडळाकडून काही सूचना करण्यात आल्या असून प्रत्यक्ष बांधकामाच्या वेळी बस स्थानकातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊन प्रवाशांना त्रास होणार नाही, याची दक्षता संबंधीत यंत्रणेने घ्यावी, असे निर्देश रावते यांनी यावेळी दिली. या बैठकीला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर, एस.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल, महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.