कल्याण-डोंबिवलीतून लागोपाठ 3 मुले गायब अपहृत मुलांमध्ये अल्पवयीन तरूणीचाही समावेश
डोंबिवली- कल्याण आणि डोंबिवली शहरातून लागोपाठ 3 मुले बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यांत दाखल असून बेपत्ता झालेली मुले सापडली नसल्याने पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. यातील एका प्रकरणात अल्पवयीन तरूणीला पळवून नेणाऱ्याचा ठावठिकाणा पोलिसांच्या हाती लागला आहे.
पश्चिम डोंबिवलीच्या रेतीबंदर रोडला मोठागाव येथील शिवशांती चाळीत राहणारी कविता साळवे (35) या महिलेच्या तक्रारीनुसार विष्णूनगर पोलिसांनी अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या महिलेचा 15 वर्षीय मुलगा मयूर हा 8 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजल्यापासून क्लासहून परतत असताना बेपत्ता झाला. हाफ ब्लॅक व भगव्या रंगाचा फूल टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स पँट परिधान केलेल्या या मुलाकडे डॉन बॉस्को शाळेची स्कुल बॅग देखील आहे. या संदर्भात फौजदार व्ही. के. पाटील व त्यांचे सहकारी या मुलाचा कसोशीने शोध घेत आहेत.
दुसऱ्या घटनेत पूर्वेकडील खंबाळपाडा-कांचनगाव येथील साईराज पार्क सोसायटीत राहणारे भिकू केदारे (33) यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भिकू यांची मोठी बहीण सुनीता पांडे हिचा 11 वर्षीय मुलगा संजय हा 5 मार्च रोजी सकाळी 11 वाजल्यापासून घरातून बेपत्ता झाला. हा मुलगा अद्याप हाती लागला नसून फौजदार रोळी त्याचा शोध घेत आहेत.
तिसऱ्या घटनेत कल्याण-शिळ मार्गावर नेतीवली येथील गणेश नगरात राहणारे रामदास पडवळ (48) यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांची 16 वर्षीय मुलगी ममता ही 1 मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून घराजवळून अचानक बेपत्ता झाली. घरच्यांनी शोध घेऊनही ही मुलगी सापडली नाही. तर्क केला असता आपल्या मुलीला उल्हासनगर – 3 येथील वाल्मिक नगरात राहणारा शिवा डंगेटी याने पळवून नेल्याचा संशय बळावला. या प्रकरणी फौजदार एस. एस. केदार व त्यांचे सहकारी अपहृत ममता आणि तिला पळविणारा अपरणकर्त्या शिवा डंगेटी यांचा शोध घेत आहेत.
Hits: 32