कल्याणमध्ये युवक कॉंग्रेसचे सरकारच्या विरोधात निषेधासन
कल्याण – राज्यातील भाजप-सेना सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी कल्याणमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने निषेधासन हे अभिनव आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या आदेशानुसार, माजी आमदार संजय जी दत्त व जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या मार्गदर्शन तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटनीस ब्रिजकिशोर दत्त यांच्या सहकार्याने कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवक कॉंग्रेसचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष राहुल काटकर यांच्या नेत्तृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
सरकारला बुधवारी चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हे आंदोलन करण्यात आले. या सरकारला केवळ योगाचीच भाषा कळते, त्यामुळे त्यांच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी काही योगासने यावेळी सादर करण्यात आली. राफेलासन, महागाई आसन, वाचाळासन, भक्तासन, क्लीनचीट आसन, ट्रोलासन, गाजरासन, धमकी आसन, बेरोजगार आसन अशी काही विडंबनात्मक आसन यावेळी करण्यात आले. भाजपाने निवडणुकीपूर्वी जनतेला विविध आश्वासने दिली. केंद्रात आणि राज्यात सरकार स्थापन होऊन चार वर्षांचा कालावधी लोटला तरीही आश्वासने पूर्ण केली नसून, सर्वसामान्य नागरिकांची शासनाने फसवणूक केल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष राहुल काटकर यांनी यावेळी केला. या आगळ्या वेगळ्या आंदोलनाने येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल काटकर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कांचन कुळकर्णी, कल्याण लोकसभा युवक काँग्रेस माजी अध्यक्ष शैलेश तिवारी, डोंबिवली विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष पमेश म्हात्रे, कपिल सूर्यवंशी, सचिन टेंबिटकर, इंद्रजीत गुप्ता, जफर खाटिक, राधिका गुप्ते, शिला भोसले, उज्वला पाटील, वर्षा दोषी, वर्षा गुजर, मुन्ना श्रीवास्तव, पोली जेकब आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.