कल्याणमध्ये बोगस डॉक्टरच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
कल्याण :- येथे दुसऱ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र लावून रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका बोगस डॉक्टरच्या बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
रफिक नासिर शेख असे या बोगस डॉक्टरचे नाव असून कल्याण पश्चिमेतील बैल बाजार परिसरात ‘सिफा हेल्थ क्लिनिक’नावाने तो क्लिनिक चालवत होता.
याठिकाणी त्याच्याकडून गुप्तरोगावरील आजारावर उपचार केले जायचे. यासंदर्भात बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक सचिन नाईक यांना खबऱ्यामार्फत माहीती मिळाली होती.
त्याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र तायडे यांनी आपल्या पथकामार्फत या क्लिनिकमध्ये छापा टाकत रफिकच्या मुसक्या आवळल्या.
त्याच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र, क्लिनिक चालवायचा परवाना, शैक्षणिक कागदपत्रांची मागणी केली असता त्याला काहीही सादर करता आले नाही.
उलट अंधेरी येथील मुश्ताक गुलाम हुसेन शेख या डॉक्टरच्या नावाचे प्रमाणपत्र क्लिनिकमधील भिंतीवर लावलेले सापडले.
यावरून रफिक आपण स्वतः डॉक्टर असल्याचे भासवत रुग्णांवर बेकायदेशीरपणे उपचार करत असल्याचे स्पष्ट झाले.
बाजारपेठ पोलिसांनी रफिकबरोबरच त्याला आपल्या नावाचे वैद्यकीय प्रमाणपत्र देणारया अंधेरी येथील मुश्ताक शेखलाही अटक केली.
रफिकने आतापर्यंत अनेक जणांवर उपचार करीत मोठ्या प्रमाणावर पैसे लाटल्याचेही प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक तायडे यांनी एलएनएनश बोलताना दिली. तसेच ठाणे आणि मुंबईतही अशाच बोगस डॉक्टरचे मोठे रॅकेट असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान रफिक आणि मुश्ताकवर बाजारपेठ पोलीस ठाण्यात भा.द.वि. सह महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.