औषधी वनस्पतींच्या संशोधनासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – महाराष्ट्रातील औषधी वनस्पतीची भौगोलिक नकाशानुसार उपलब्धता व या वनस्पतीच्या संकलनाचे उत्तम काम राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाने केले आहे. या व अशा पध्दतीच्या संकलन व संशोधनासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
महाराष्ट्रातील औषधी वनस्पतींच्या माहितीचे संकलन या डेटा बेसचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही.आर. श्रीनिवासन, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे अध्यक्ष डॉ.अनिल काकोडकर यांच्यासह या प्रकल्पात सहभागी वैज्ञानिक, तज्ज्ञ उपस्थित होते.
राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगातर्गत या प्रकल्पाच्या समन्वयाचे काम आघारकर संशोधन संस्था, पुणे व अन्य १४ संस्थानी केले. सहकार्याने ४ वर्षाच्या परिश्रमातून ही माहिती संकलित करण्यात आलेली आहे.सुमारे 200 क्षेत्रीय विद्यार्थी क्षेत्रीय कार्यात सहभागी झाले होते. या डेटा बेसमध्ये ४०० वनस्पतीची विविधता आणि उपलब्धता, १५७ महत्वाच्या वनस्पतीची सांख्यिकी माहिती, २५३ वनस्पतीची औषधी उपयोग विषयीची माहिती, वनस्पतीची बाजारातील उपलब्धता आणि उद्योगातील वापर या विषयीची माहिती दिली आहे.
औषधी वनस्पतीचा हा डेटा बेस वापरण्यात सोपा असून औषधी वनस्पतीचा वापर करणारे, त्यावर संशोधन करणारे आणि अन्य इच्छुक यांनाही उपयुक्त ठरेल असे मत डॉ. काकोडकर यांनी यावेळी व्यक्त केले. या डेटा बेसवर आधारित “महाराष्ट्रातील महत्वाच्या औषधी वनस्पती” हे पुस्तक आघारकर संशोधन संस्थेच्या डॉ. अनुराधा उपाध्ये आणि डॉ. विनया घाटे यांनी लिहिले आहे. त्याचे प्रकाशनही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email