ऑनलाईन वीजबिल भरण्यासाठी सेवाशुल्क माफक :ग्राहकांनी ऑनलाईनद्वारेच वीजबील भरावे : महावितरणचे आवाहन

(म.विजय)

मुंबई – महावितरणने राज्यातील सर्व ग्राहकांना ऑनलाईन पध्दतीद्वारे वीजदेयक भरण्याची सुविधा 2005 पासून उपलब्ध करुन दिली आहे. ग्राहक महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच महावितरणच्या मोबाईल ऍ़पद्वारे केंव्हाही व कुठूनही ऑनलाईन पध्दतीने वीजदेयकाचा भरणा करु शकतो. या प्रणालीची कार्यपध्दती महावितरणच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. सदर पध्दतीमध्ये वीजग्राहक त्यांच्या वीजदेयकाचा भरणा क्रेडीट / डेबीट कार्ड, नेट बँकींग व यु.पी.आय. इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत करु शकतो. या सुविधेसाठी सेवाशुल्क अत्यंत माफक आहेत. त्यामुळे या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

ऑनलाईन पध्दतीने वीजदेयकाचा भरणा करणे अत्यंत सुरक्षित असून, सदर पध्दतीस आर.बी.आय.च्या पेमेंट व सेटलमेंट कायदा 2007 च्या तरतूदी लागू आहेत. ऑनलाईनने वीजदेयक भरणा केल्यास ग्राहकांना त्वरीत एसएमएस व भरणा पावती दिली जाते. सद्यस्थितीत महावितरणचे 30 लाख ग्राहक सदर सुविधेचा लाभ घेत असून यातून दरमहा महावितरणला ऑनलाईन वीजबील भरणा पध्दतीद्वारे साधारणत: रु. 600 कोटी महसुलाची प्राप्ती होते.

अशा प्रकारच्या देयकभरणा प्रणालीमध्ये मास्टर, व्हीजासारख्या संस्था (Payment Gateway Service Provider Agencies) क्रेडीट/ डेबीट कार्ड, इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत देयक अदा करण्याच्या सुविधांसाठी सुविधा शुल्क आकारतात. याबाबतीत महावितरणच्या ग्राहकांना आकारले जाणारे सुविधा शुल्क अत्यंत माफक व वाजवी आहेत. इतर राज्यातील वीज वितरण कंपन्यांच्या तुलनेत महावितरणच्या ग्राहकांना आकारले जाणारे सुविधा शुल्क अत्यंत कमी आहेत.

महावितरणच्या ग्राहकाने क्रेडीट/डेबीट कार्ड, यु.पी.आय. मार्फत वीज देयकाचा भरणा केल्यास रुपये 500 पर्यंत कोणतेही सुविधा शुल्क आकारले जात नाही. तसेच नेटबँकींगद्वारे कितीही रकमेपर्यंतचा वीजदेयकाचा भरणा केल्यास त्याला कोणत्याही प्रकारचे सुविधा शुल्क भरावे लागत नाही. या दोन्हीही पर्यायासाठीच्या सुविधा शुल्काचा भरणा महावितरण मार्फत करण्यात येतो.

ऑनलाईन पध्दतीने वीजबिल भरणा करण्याबाबत काही अडचणी असल्यास व त्यासंदर्भातील तक्रारी निवारण करण्यासाठी महावितरणने एक स्वतंत्र मदत कक्ष स्थापन केला असून, helpdesk_pg@mahadiscom.in या ई-मेल आयडीवर मेल केल्यास ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येते. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी महावितरणचे मोबाईल ऍ़प व संकेतस्थळामार्फत ऑनलाईनद्वारेच वीजबील भरावे व या सुविधेचा लाभ घ्यावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Hits: 8

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email