एमआयडीसीत पाणी चोरांचं चांगभलं,

मोठ्या पाईपलाईन्सला होल पाडून खुलेआम होतात चोऱ्या,प्रशासन अनभिज्ञ ?

(श्रीराम कांदु)

डोंबिवली  : बदलापूर पाईपलाईन रोडवरील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मोठ्या जलवाहिन्यातून सर्रासपणे पाण्याची चोरी होत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. मात्र सद्या कल्याण-शिळफाटा रोडला असलेल्या एमआयडीसीच्या मोठ्या पाईपलाईन्सला भोक पाडून खुलेआम चोऱ्या होऊ लागल्या असून या प्रकारांबद्दल स्थानिक पातळीवर प्रशासन अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
एमआयडीसीच्या जलवाहिन्या बारवी धरणाच्या पायथ्यापासून नेवाळी नाका, बदलापूर, अंबरनाथ, खोणी गावाहून, कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील काटई नाक्याजवळ आणण्यात आल्या आहेत. या वाहिन्यांमध्ये चोवीस तास पाणी भरून ठेवण्यात येते. अंबरनाथपासून ते शिळफाटा अशा सुमारे 10 किलोमीटरच्या परिसरात अनेक सर्व्हीस सेंटर आहेत. या ठिकाणी सेंटरचे चालक-मालक बिनधास्तपणे नजीकच्या पाईपलाईनला भोक पाडून त्यामधून अनधिकृत नळजोडण्या घेऊन आपला गोरख धंदा करत आहेत. शिवाय परिसरातील हॉटेल, ढाबे, भाजीपाला लागवड करणारे शेतकरीही एमआयडीसीच्या या पाईपलाईनच्या पाण्यावर अवलंबून आहेत. यातील अनेक ढाबे व हॉटेल्सना कोणत्याही प्रकारचे परवाने नसतानाही शासकीय यंत्रणांच्या डोळ्यांत धूळफेक करत त्यांचे धंदे अव्याहतपणे करताना दिसत आहेत. त्यातच टँकर माफिया देखिल अपवाद राहिलेले नाहीत.
सद्या डोंबिवली एमआयडीसी फेज 2 येथील पिंपळेश्वर हॉटेल समोर येथील मोठया पाईपलाईनमधून गेल्या 3 दिवसांपासून पाण्याची गळती मोठया प्रमाणात होत आहे. याबद्दल एमआयडीसीला कळवूनही अद्यापही पाणी गळती दुरुस्ती केली नाही. याचा गैरफायदा रिक्षावाले, लगतचे अनधिकृत टपरीवाल्यांनी घेतला आहे. एमआयडीसी क्षेत्रात अनेक ठिकाणी एमआयडीसीच्या मुख्य पाईपलाईन जॉईंटजवळ पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. फक्त 1 किमी पाईपलाईनचा सर्व्हे केला असता 3 ठिकाणी पाण्याची गळती दिसली. कल्याण-शिळ रोडवरील नेकनीपाडा बस थांब्याजवळ बस, रिक्षा धुण्याचे काम चालू असते. तर काही जणांनी भांडी, बादल्या रांग लावून ठेवल्या होत्या. हे सर्व अनेक महिन्यांपासून चालू असल्याचे जवळ रहाणारे प्रत्यक्षदर्शी रहिवासी सांगत आहेत. या पुढील काळात पाणी कपात करण्यात येणार आहे. जर ही पाणी गळती थांबविली तर मोठी पाणी बचत होऊ शकेल, असे या भागातील सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी सांगितले. एमआयडीसी/केडीएमसीकडे नागरीकांनी तक्रार केली तरच काही दिवसांनी ते दुरूस्ती करतात. मात्र स्वतःहून अधूनमधून अधिकारी पाहणी का करीत नाहीत ? वरील 3 ठिकाणी गळतीची तक्रार केली किंवा प्रसार माध्यमांनी उघड केलीत तरच कारवाई करणार का ? असेही सवाल नलावडे यांनी उपस्थित केले.
या संदर्भात स्थानिक प्रशासन या सगळ्या गोष्टींपासून अनभिज्ञ असल्याचा कांगावा करतात. आश्चर्यकारक चेहरा करून “काय बोलता ? कधी ? कुठे ? आम्हाला माहित नाही. एक काम करतो, माहिती घेऊन सांगतो”, अशी अधिकाऱ्यांकडून उत्तरे मिळत असतात.
दरम्यान, या परिसरातील अनेक व्यावसायीक जलवाहिन्यांना छिद्र पाडून त्यामधून चोवीस तास पाणी वापरतात, ही बाब महामंडळाच्या अधिकाऱ्यांना या पूर्वी आढळून आली होती. त्यानुसार कारवाई देखिल करण्यात आली. शिवाय यावर रामबाण उपाय म्हणून जलवाहिन्यांच्या देखभालीसाठी सुरक्षारक्षक तैनात करण्याचा निर्णयही एमआयडीसिने घेतला होता. मात्र या सर्व घोषणा हवेत विरल्या असून सद्य:स्थितीतही मोठ्या प्रमाणात व खुलेआम पाणीचोरी होत आहे. त्यामुळे पोलिस आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांचे यावर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Hits: 11

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email