एमआयएमच्या मुंब्रा बंदचा पुरता फज्जा
ठाणे (प्रतिनिधी)- कब्रस्तानच्या मुद्यावर मुंब्रा बंद करण्याचा एमआयएमचा डाव मुंब्रावासियांनीच हाणून पाडला. आगामी महिनाभरात कब्रस्तान कार्यान्वित होणार असतानाही त्याचे राजकारण करुन नागरिकांना वेठीस धरण्याचा एमआयएमचा प्रयत्न पुरता फसला असून मंगळवारी दिवसभर मुंब्रा भागातील सर्व व्यवहार सुरळीत असल्याचेच दिसून आले.
कब्रस्थानच्या नावाखाली मुंब्रा येथे एमआयएमच्या वतीने ’मुंब्रा बंद’चे आवाहन करण्यात आले होते. मात्र, या बंदला एक टक्कादेखील प्रतिसाद जनतेने दिला नाही.त्यामुळे मुंब्रा भागातील सर्व दैनंदिन व्यवहार 100 टक्के सुरळीत सुरु असल्याचे पहावयास मिळाले. काही भागात दमदाटी करुन बंद करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र, स्थानिकांनी दमदाटी करणार्यांनाच पिटाळून लावल्याचे चित्र पहावयास मिळाले. मुंब्य्रातील रिक्षा युनियनवर बंदमध्ये सहभागी होण्यासाठी दबाव टाकला जात होता. मात्र, त्यांनी दबावाला बळी न पडता रिक्षा वाहतूक सुरु ठेवल्यामुळे नागरिकांना प्रवासाच्या अडचणी निर्माण झाल्या नाहीत. त्यांचा प्रवास सुरळीत झाला. तर, बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस उपायुक्त स्वामी यांनी तर रात्रीपासूनच मुंब्रा- कौसा भागात तळ ठोकलेला असल्यामुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही.