उपनगरी गाडीतील आश्चर्याचा धक्का..!
(शेखर जोशी यांच्या फेसबुक वॉलवरून साभार)
उपनगरी गाडीत आजकाल कोणीही व्यक्ती/प्रवासी (अपवाद वगळता) पुस्तक वाचताना दिसत नाही. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट भ्रमणध्वनी पाहायला मिळतो. पण बुधवारी दुपारी एका तरुणाच्या हातात भ्रमणध्वनीऐवजी चक्क पुस्तक होते.हा आश्चर्याचा धक्का होताच. पण त्याही पुढचा धक्का होता तो म्हणजे ते पुस्तक चक्क कविता संग्रहाचे होते. कवी ग्रेस यांचा ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’ हा कविता संग्रह तो तरुण वाचत होता.
ती गेली तेव्हा रिमझिम…, भय इथले संपत नाही…, पाऊस कधीचा पडतो ही ग्रेस यांनी लिहिलेली गाणी (कवितांची झालेली गाणी) लोकप्रिय आहेत. पण ग्रेस यांची एकूण कविता समजायला कठीण असल्याचे सर्वसामान्य वाचकांना वाटते आणि काही प्रमाणात त्यात तथ्यही आहे.
ग्रेस या प्रतिभावान कवीच्या काही कविता समजत नाहीत किंवा त्यामागचा खरा अर्थ वेगळाच असतो. ग्रेस यांच्या या कवितांचे जाणकार, अभ्यासु मंडळीनी विवेचन केले तर कवितेचा अर्थ उलगडतो आणि सर्वसामान्यानाही त्याचे आकलन होते. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रमात ज्येष्ठ गायक- संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी ग्रेस यांच्या कवितांचा अर्थ सहजपणे उलगडून दाखवलेला आठवतोय.
उपनगरी गाडीतील प्रवाशांमध्ये मुळात वाचनसंस्कृती कमी झालेली असताना आणि वाचन करायचे झालेच तर ते ललित साहित्याचे (कथा, कादंबरी, विनोदी लेखन) अशी सहज मनोवृत्ती असताना कवितांचे पुस्तक आणि ते ही ग्रेस यांच्या कवितांचे वाचन केले जाते हे खरोखरच कौतुकास्पद आहे.
वाचन संस्कृती जोपासणा-या या अनामिक तरुणाला सलाम!
-शेखर जोशी
१८ एप्रिल २०१८