उन्हाळ्यात पोटाच्या विकारांमध्ये  ५० टक्क्यांनी वाढ

रस्त्यावरील खाद्यपदार्थ  हगवण व जुलाबाला ठरतायेत कारणीभूत 

(म.विजय )

 खाऊगल्ल्या  अथवा रस्त्यावरील खाद्यपदार्थांचे स्टॉल हा प्रत्येक शहराचा अविभाज्य भाग झाला असून खाऊ गल्लीतील पदार्थांचा आस्वाद घेतला नाही असा मुंबईकर अथवा ठाणेकर सापडणार नाही. घर ते ऑफिस यामधील अंतर वाढल्यामुळे बाहेरील खाद्यपदार्थ खाणे ही अपरिहार्यता बनली आहे, परंतु नवी मुंबईतील हॉस्पिटलच्या सर्वक्षणानुसार उन्हाळ्यामध्ये बाहेरील खाद्य पदार्थ खाल्यामुळे पोटांच्या विकारात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे तसेच किडनीच्या विकारातही लक्षणीय वाढ झाली आहे. 

खाद्यपदार्थ खाल्ल्यावर तेथे उपलब्ध असलेले निकृष्ट दर्जाचे पिण्यासाठी पाणी व  खाण्याच्या पदार्थावर घोंघावणाऱ्या माश्या यातून बरेचदा जिवाणूंना आपल्या शरीरात प्रवेश करायला आयती  संधी मिळत आहेत. याबाबत माहिती देताना वाशी येथील स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख डॉ मेहुल कालावाडिया सांगतात, ” गेल्या १५ दिवसात हगवण व जुलाबाचा त्रास असलेल्या पेशंटमध्ये ५० टक्के वाढ झाली असून वोक्हार्ट हॉस्पिटलने  केलेल्या अंतर्गत सर्वेसक्षणानुसार या आजारासाठी बाहेरील खाद्यपदार्थ कारणीभूत ठरत आहेत. सध्या तापमानात झालेल्या वाढीमुळे सतत घाम येतो. त्यातच खाद्यपदार्थ तयार होत असलेल्या भट्टीशेजारी काम करणाऱ्या  आचाऱ्यांची स्थिती अधिक वाईट असते त्यांना येणाऱ्या सततच्या घामामुळे जीवाणूंचा संसंर्ग  वाढण्याचा धोका असतो  अन्न शिजवताना, वाढताना हातमोजे (ग्लोव्ह्ज ) घालणे फार महत्वाचे आहे. डोसा, पावभाजी, चहा असे पदार्थ गरम असल्याने त्यातून  संसर्ग कमी होतो परंतु  मात्र सॅण्डविच, भेळपुरी-शेवपुरी- चायनीज , फ्रॅंकीज  अशा पदार्थासाठी कांदे, टोमॅटो कोथींबीर  खूप आधीपासून चिरलेले असण्याची शक्यता असल्याने त्यातून  ई-कोलाय, कॉलीफॉर्म, स्टॅफिलोकोकस ऑरिअस अशा हगवण व जुलाबाला  कारणीभूत ठरणाऱ्या जिवाणूंचा संसर्ग होत असतो. सहज उपलब्ध होणारी रस्त्यावरील  लिंबू पाणी, ताक, फळांचे ज्यूस, कोल्ड्रिंक आणि इतर ड्रिंक्ससुद्धा पोटांच्या विकाराला कारणीभूत ठरत आहेत.”

नवी मुंबईतील नेरुळ येथील  तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमधील किडनी विकार तज्ञ डॉ. जितेन्द्र खांडगे सांगतात, “उन्हाळ्यामध्ये हवेतील आर्द्रता कमी होते व कोरडेपणा वाढतो. त्यामुळे आपल्या शरीरातून घाम येण्याचं प्रमाण वाढतं व शरीरातील पाणी पातळी कमी होते. पाण्याचा समतोल ठेवण्याची जबाबदारी किडनीवर असल्याने त्याचा विपरित परिणाम सर्वसाधारण किडनीवर होत असतो. मार्च ते जून महिन्याच्या अखेरीपर्यंत मुतखड्याच्या पेशंटमध्ये ३० ते ४० टक्क्यांनी वाढ होते. किडनी स्टोन म्हणजेच मुतखड्यावर वैद्यकीय उपचार करणे फार गरजेचे असते अनेकवेळा नागरिक याकडे दुर्लक्ष करतात व त्यामुळे किडनीसंबंधित विकार बळावण्याची शक्यता निर्माण होते. मूत्रपिंड दररोज जवळपास १८० लिटर इतके रक्त शुद्ध करते. त्यातून दोन लिटर मूत्र दररोज तयार होते त्यामुळे अशी महत्त्वपूर्ण कार्य करणारे मूत्रपिंड निरोगी राहणे अतिशय महत्त्वाचे आहे.”

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email