इंदिरा चौकातील वाहतूक कोंडीचा विद्यार्थ्यांना फटका
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – १० विच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु असून परीक्षा केंद्रावर वेळेआधी पोहचण्यासाठी विद्यार्थी घरातून लवकर निघतात. मात्र डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकातील वाहतूक कोंडीचा या विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. याला येथील मुजोर रिक्षाचालक आणि वाहतूक व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देत नसलेले वाहतूक पोलीस जबाबदार आहेत. या परीस्थितीत बदल होण्यासाठी एकही राजकीय पक्ष अथवा रिक्षायुनियनेने का प्रयत्न केले नाही असा प्रश्न नागरिक विचारीत आहेत.
इंदिरा चौक हे डोंबिवलीतील वाहतुकीसाठी महत्वाचे ठिकाण आहे. मात्र या चौकाचा ताबा मुजोर रिक्षाचालकांनी घेतला आहे. वाहतूक पोलीस या चौकात मोटरसायकलस्वारांना पकडत असून रिक्षाचालकांना अभय देत असल्याचे दिसत आहे. वाहतूक पोलीस निरीक्षक गोविंद गंभिरे हे वाहतूक पोलीस संख्या कमी असल्याची सबब पुढे करत असले तरी या चौकात एकाच ठिकाणी चार ते पाच पोलीस उभे असल्याचे दिसतात. १० विची परीक्षा सुरु असून विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये म्हणून या चौकात वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष देत आवश्यक आहे. काही विद्यार्थी परिवहन बसने तर विद्यार्थी रिक्षानेप्रवास करून परीक्षा केंद्रावर पोहोचतात. मात्र या चौकात सतत वाहतूक कोंडी होत असल्याने विद्यार्थी आणि पालकवर्ग वैतागले आहेत. निदान परीक्षा संपेपर्यंत या चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला पाहिजे होता. दुसरीकडे विविध पक्षाच्या झेंड्याखाली असलेल्या रिक्षा युनियनहि याकडे लक्ष देत नसल्याचे दिसते.