आरोग्य अधिका-याचे निवृत्ती वय वाढीबाबत पालिका अनभिज्ञ
डोंबिवली – राज्यभरात आरोग्य सेवेतील तब्बल २२६ वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी ३१ मे रोजी निवृत्त होत असताना शासनाने या वैद्यकीय अधिकार्याच्या निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याचा अध्यादेश प्रसिद्ध केल्याने या डॉक्टराणा मुदतवाढ मिळाली आहे. मात्र हा निर्णय कल्याण डोंबिवली महापालिकेत अद्यापि पोचलेला नाही. कल्याण डोंबिवली महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ स्मिता रोडे या देखील या नियमानुसार निवृत्त झाल्या असून पुढील २ महिन्यात आणखी दोन डॉक्टर सेवा निवृत्त होत आहेत. मात्र या आदेशाची अमलबजावणी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने अद्यापि केलेली नसल्यामुळे शासनाचे अध्यादेश पालिका प्रशासनाला लागू पडत नाहीत का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शासनाच्या सेवेतील आरोग्य अधिकारी ३१ मे रोजी मोठ्या संख्येने निवृत्त होत असल्यामुळे आधीच आरोग्य अधिकार्याची कमतरता असताना त्यात अनुभवी डॉक्टर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर निवृत्त होत असल्यामुळे आरोग्यचिंता भेडसावण्याची भीती व्यक्त होत होती या पार्श्वभूमीवर ३१ मे पूर्वी या डॉक्टराचे निवृत्ती वय वाढविण्या बाबत निर्णय अपेक्षित होता मात्र पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शासनाला अध्यादेश काढण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मान्यतेची गरज असल्यामुळे हा अध्यादेश लांबला. अखेर निवृत्तीच्या तारखेच्या कार्यालयीन वेळेचे कामकाज संपल्या नंतर शासनाचा अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला असून यामुळे निवृत्त झालेले तब्बल २२६ शासकीय सेवेतील डॉक्टर पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत. मात्र त्याचबरोबर महापालिकेच्या सेवेत असलेले अनेक डॉक्टर देखील काल सेवा निवृत्त झाले आहेत. मात्र ठाणे महापालिकेने या अध्यादेशाची अमलबजावणी केली असली तरी कल्याण डोंबिवली महापालिकेला मात्र या निर्णयाची अमलबजावणी करायची किवा नाही हा प्रश्न पडला आहे. याबाबत पालिका आयुक्त गोविंद बोडके यांना विचारले असता शासनाचा अध्यादेश आपल्याला प्राप्त झाला असला तरी त्याची अमलबजावणी करायची किंवा नाही याबाबत माहिती घेतल्या नंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगितले.