आयोगावर सदस्य करतो अशी बतावणी करुन डॉक्टरची फसवणूक ; दोघा ठगांना अटक

ठाणे – राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमातीच्या आयोगावर सदस्य करतो, अशी थाप मारून ठगाने साथीदाराच्या मदतीने डॉक्टरला लाखो रुपयांचा गंडा घातला.याप्रकरणी खडकपाडा पोलीसांनी फसवणूक झालेल्या डॉक्टरच्या फिर्यादीवरून दोघा ठगांना बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात असलेल्या शेलारपार्कमधील डॉक्टर रामकृष्ण पवार यांची ओळख २०१६ मध्ये शिरपूरच्या अमृत बोरसे याच्याशी झाली होती. आपण आदिवासी आश्रम शाळेत काम करत आहेत. आपण आदिवासींचे अनेक उपक्रम राबवत असतो. तुम्ही राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य व्हा, अशी बतावणी अमृत बोरसे याने केली. आपली आयोगात ओळख असल्याने तुम्हीही त्याचे सदस्य बनू शकता, असे त्याने डॉ. पवार यांना सांगितले.
त्यानंतर दिल्लीचा कुणाल शर्मा हा आयोगात मोठा अधिकारी असल्याचे भासवून त्याच्या नावाचा वापर करून बोरसे याने डॉ. पवार यांच्याकडून १३ लाख ९० हजार रुपये उकळले. मात्र, या दुकलीने डॉ. पवार यांना चूना लावल्याचे लक्षात येताच त्यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या दुकलीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तपासाची चक्रे फिरवून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जी. व्ही. तुंबडा, शेले, आहेर, गरूड या पथकाने शिरपूर येथील राहत्या घरातून अमृत बोरसे याला बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे आरोपीला पोलीस आपल्या मागावर असल्याची कुणकुण लागली होती. यामुळे तो अहमदाबादला पसार होण्याच्या मार्गावर होता. मात्र, त्याला अटक करून त्याच्या घराची झडती घेण्यात आली. यात बोरसेकडील बनावट लेटरहेड, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे ओळख पत्र, भारतीय राजमुद्रा, गाडीची भारत सरकार असलेली नेमप्लेट, विविध बँकांचे पासबुक, आदी संशयास्पद मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
त्यानंतर आयोगाचा बोगस अधिकारी कुणाल शर्मा याच्याही दिल्ली येथून मुसक्या आवळण्यात आल्या. चौकशीदरम्यान या दुकलीने कल्याणकर डॉ. पवार यांची फसवणूक केल्याची कबूली दिली. कल्याण न्यायालयाने या दुकलीला अधिक चौकशीकरता पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या भामट्यांनी अशाच पद्धतीने आणखी किती लोकांना शेंडी लावली, याचा वपोनि बाळासाहेब कदम व त्यांचे पथक शोध घेत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email