आयुषमान भारतासाठी जनसहभाग आवश्यक: मृदुला सिन्हा
पणजी, दि.०४ – आयुषमान भारत, भारतीय विचारधारेशी जोडलेला आहे. सनातन भारत आयुषमान असावा, यासाठी सरकारने पावले उचलली आहेत; यामध्ये प्रत्येकाचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे, असे मनोगत गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी आज व्यक्त केले.
आयुषमान भारत व पोषण अभियान जनजागृतीसाठी गोवा विद्यापीठामध्ये आज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रीजनल आऊटरीच ब्युरो, पुणे व गोवा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात राज्यपाल मृदुला सिन्हा याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. पत्र सूचना कार्यालय, पणजी प्रमुख अपर महासंचालक अर्मेलिंदा डायस यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
5 कोटी परिवारांना या आयुषमान भारत योजनेमधून पोषण पुरविले जाणार असून सुमारे 50 कोटी नागरिक त्याचे लाभार्थी असतील, अशी माहिती राज्यपालांनी यावेळी दिली. समाजनिर्मिती मध्ये सरकारचे काम मिठाप्रमाणे असावे व बाकी भूमिका नागरिकांची असावी, नागरिकांचा सहभाग, जबाबदारी अत्यंत महत्वपूर्ण आहे. पुढच्या पिढीपर्यंत हा संदेश योग्यप्रकारे पोहचविल्यास युवा नक्की पुढे येतील, असं विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला. जनआंदोलनाशिवाय सफलता मिळणार नाही. या सरकारी उपक्रमामध्ये गोवा विद्यापीठाची देखील भागीदारी कायम असेल, असे आश्वासन त्यांनी कुलपती या नात्याने त्यांनी यावेळी दिले.
या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र व गोवा राज्यातील ग्रामीण लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. ज्यातून पोषक आहार व आरोग्यपूर्ण जीवनाचे महत्त्व सांगण्यात आले.
यावेळी गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. वरुण साहनी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. गोवा विद्यापीठासोबत कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यापुढेही विद्यापीठ सर्व सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पत्र सूचना कार्यालय, पश्चिम विभाग प्रमुख महासंचालक आर. एन. मिश्रा यांनी पुण्याच्या केळकर संग्रहालयामध्ये संग्रहित दिव्यांवर आधारित ‘लॅम्पस् ऑफ इंडिया’ हे पुस्तक राज्यपाल मृदुला सिन्हा यांना भेट दिले.
विद्यापीठाचे रेजिस्ट्रार वाय. व्ही. रेड्डी यांनी आभार प्रदर्शन केले.