आदित्य ठाकरे यांच्या हस्ते दिवा रेल्वे उड्डाणपुल, उल्हासनगर कामगार रुग्णालयाचे भूमिपूजन खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

 

(श्रीराम कांदु)

ठाणे दि.०४ – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे उल्हासनगर येथील कामगार रुग्णालयाचा पुनर्विकास होत असून १२५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे भूमिपूजन शिवसेना नेते व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवार, ३ मार्च रोजी झाले. त्याचप्रमाणे, रेल्वे सेवा गतिमान करण्यासाठी व रेल्वे अपघात टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या दिवा येथील रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजनही श्री. ठाकरे यांच्या हस्ते झाले. याशिवाय, खासदार निधीच्या माध्यमातून डॉ. शिंदे यांनी उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी डोंबिवली येथील सावळाराम क्रीडा संकुलात विकसित केलेली क्रिकेट खेळपट्टी आणि कल्याण पूर्व येथे बांधलेल्या दोन वाचनालयांच्या लोकार्पणाबरोबरच आमदार सुभाष भोईर यांच्या सहकार्याने व ठाणे महापालिकेच्या माध्यमातून पडले गावात ४ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या तीर्थस्वरूप नानासाहेब धर्माधिकारी सभागृहाचे भूमिपूजनही रविवारी झाले.

याप्रसंगी राज्याचे आरोग्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, आमदार सुभाष भोईर, रवींद्र फाटक, डॉ. बालाजी किणीकर, माजी आमदार कुमार आयलानी, ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी, आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, ठाणे महापालिकेचे सभागृह नेते नरेश म्हस्के, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर विनिता राणे, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, सभागृह नेते श्रेयस समेळ, महानगरप्रमुख विजय साळवी, कल्याणचे शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, डोंबिवलीचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उल्हासनगरचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उल्हासनगर महापालिकेतील विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, यांच्यासह स्थानिक नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उल्हासनगर येथे कामगार रुग्णालयाची इमारत व १२ निवासी इमारती असे मोठे संकुल असून या सर्व इमारती जीर्ण झाल्याचा अहवाल आयआयटी, मुंबईने दोन वर्षांपूर्वी दिला होता. त्यामुळे या सर्व इमारती पाडून त्याजागी सुसज्ज रुग्णालय बांधण्याची मागणी खा. डॉ. शिंदे यांनी लोकसभेत ४ ऑगस्ट २०१७ रोजी केली होती. तसेच, त्यानंतर केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय, विद्यमान मंत्री संतोष गंगवार, राज्याचे तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, कामगार विमा योजनेचे महासंचालक श्री. राजकुमार, मुख्य अभियंते सुदीप दत्ता, कामगार विमा योजना समितीचे प्रमुख खासदार चंद्रकांत खैरे अशा सर्व पातळीवर सातत्याने पाठपुरावा करून या पुनर्विकासाला मंजुरी मिळवली. केंद्र शासनाने १२५ कोटी रुपयांचा निधी या प्रकल्पासाठी मंजूर केला असून जुन्या रुग्णालयाच्या जागी १०० खाटांचे अद्ययावत, सुसज्ज रुग्णालय होणार आहे.

दिवा रेल्वे उड्डाणपुलामुळे दिलासा

दिवा रेल्वे स्थानकालगत असलेल्या फाटकामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर विपरित परिणाम होतो, तसेच रेल्वे रुळ ओलांडताना अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपुलाला मंजुरी मिळाली होती. परंतु, तो विविध कारणांमुळे रखडल्यामुळे खा. डॉ. श्रीकांत शिंदे हे अडथळे दूर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते. या पाठपुराव्याला यश येऊन ३९ कोटी रुपयांच्या या कामाला आता सुरुवात होत आहे.

क्रिकेट खेळपट्टी, वाचनालयांचे लोकार्पण

कल्याण व डोंबिवली परिसरातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना सरावासाठी उत्तम सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ठाणे व मुंबईपर्यंत जावे लागते. क्रिकेटचे मोठे किट घेऊन लोकलने प्रवास करणे जिकिरीचे असल्यामुळे उदयोन्मुख क्रिकेटपटूंची गैरसोय दूर करण्यासाठी खा. डॉ. शिंदे यांनी खासदार निधीतून ४५ लाख रुपये खर्च करून डोंबिवली येथील सावळाराम क्रीडा संकुलात चार खेळपट्ट्या विकसित केल्या आहेत.

कल्याण पूर्वेत वाचनालये

मुलांमध्ये वाचनाची गोडी वाढावी, तसेच दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये त्यांना अभ्यासासाठी हक्काचे ठिकाण मिळावे, यासाठी खासदार निधीतून कल्याण पूर्व येथील लोकग्राम, तसेच नेतिवली येथे दोन वाचनालये बांधण्यात आली आहेत. लोकग्राम येथील वाचनालयासाठी एकूण ५३ लाख रुपयांचा खर्च आला असून नेतिवली वाचनालयासाठी ४८ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. या दोन्ही वाचनालयांसाठी विधान परिषदेचे आमदार जगन्नाथ शिंदे यांनीही आमदार निधीतून साह्य केले आहे.

तिर्थस्वरूप नानासाहेब धर्माधिकारी सभागृह

खा. डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार सुभाष भोईर यांच्या प्रयत्नांतून ठाणे महापालिका हद्दीतील पडले गावातील तिर्थस्वरून नानासाहेब धर्माधिकारी सभागृह नव्याने बांधण्यात येत असून त्याचेही भूमिपूजन रविवारी झाले. यासाठी सुमारे ४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email