आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत अभिमन्यू पुराणिक ग्रँड मास्टर

अभिमन्यू पुराणिक ग्रँड मास्टर

मोहम्मद नुबेरशाह शेख, समीर काथमाले आणि अभिषेक केळकर ठरले इंटरनॅशनल मास्टर

 शरथ नायर, पर्णवी राणे कल्याणमधील सर्वोत्कृष्ट बुद्धिबळपटू

कल्याण – कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित कल्याणमधील पहिल्या आंतरराष्ट्रीय जलद रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेची शानदार सांगता रविवारी येथे झाली. स्पर्धेत अभिमन्यू पुराणिक ग्रँड मास्टर ठरला, तर मोहम्मद नुबेरशाह शेख, समीर काथमाले आणि अभिषेक केळकर इंटरनॅशनल मास्टर ठरले. फिडे मास्टरचा सन्मान श्रीनाथ राव एस.व्ही. याने पटकावला. शरथ नायर हा कल्याणमधील सर्वोत्कृष्ट मुलगा, तर पर्णवी राणे ही कल्याणमधील सर्वोत्कृष्ट मुलगी बुद्धिबळपटू ठरली. स्पर्धेत एकूण २ लाख रुपयांच्या पुरस्कारांचे वाटप करण्यात आले.

भारताने जगाला देणगी दिलेल्या आणि एकेकाळी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीयांनी वर्चस्व गाजवलेल्या बुद्धिबळ या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून २१ आणि २२ एप्रिल रोजी जोशीज चेस अकॅडमी आणि कल्याण तालुका बुद्धिबळ संस्था यांच्यावतीने पहिल्या आंतरराष्ट्रीय जलद रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण (पू.) येथील मेट्रो मॉलमध्ये आयोजित या स्पर्धेचा शानदार शुभारंभ खा. डॉ. शिंदे यांच्या हस्ते शनिवार, २१ एप्रिल रोजी झाला होता.

कल्याणमध्ये प्रथमच झालेल्या या स्पर्धेत ५०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. कल्याणमधील युवा बुद्धिबळपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी पुरूष व महिला या श्रेणीत पहिल्या दोन क्रमांकाची विशेष पारितोषिके देण्यात आली. तसेच, ५५ वर्षांवरील ज्येष्ठ बुद्धिबळपटूंसाठी पहिल्या दोन क्रमांकाची पारितोषिके आणि दिव्यांग  अंध खेळाडूंसाठीही स्वतंत्र पुरस्कार देण्यात आले. ५५ वर्षांवरील बुद्धिबळपटूंच्या श्रेणीत बी. एस. नायक आणि सुरेंद्र सरदार यांना अनुक्रमे पहिल्या दोन क्रमांकाची पारितोषिके मिळाली. तर, अंध खेळाडूंच्या श्रेणीत आर्यन जोशी आणि रोशनी पात्रा यांनी पुरस्कारांवर नाव कोरले.

ठाणे जिल्हा बुद्धिबळ संघटनाअखिल मराठी बुद्धिबळ संघटना आणि भारतीय बुद्धिबळ संघटना यांची मान्यता लाभलेल्या यास्पर्धेच्या अखेरीस अभिमन्यू पुराणिक, मोहम्मद नुबेरशाह शेख आणि अभिषेक केळकर या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या बुद्धिबळपटूंशी प्रश्नोत्तराचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. या विजेत्यांना विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्यांना त्यांनी दिलेली उत्तरे यामुळे उदयोन्मुख बुद्धिबळपटू आणि त्यांच्या पालकांना बुद्धिबळ या खेळाचे विविध कंगोरे समजण्यास मदत झाली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email