अश्विन नाईकच्या गुंडाला डोंबिवलीत अटक
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – खून, खंडणी, रॉबरी, घरफोड्यांचे गुन्हे असलेला कुख्यात गँगस्टर अश्विन नाईक याच्या गँगचा धर्मराज चंदू शेडगे या 50 वर्षीय गुंडाला डोंबिवलीच्या पोलिसांनी जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. गुन्ह्यांच्या नोंदी असलेल्या या गुंडाला नाशिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पूर्वेकडील चंद्रकांत पाटकर शाळेजवळ अश्विन नाईक गँगचा शूटर येणार असल्याची खबर डोंबिवली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयसिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी संध्याकाळी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अजय किर्दत, सचिन वानखेडे, चंद्रकांत शिंदे, हेमंत राणे, ऋषिकेश भालेराव या पथकाने सापळा रचला होता. 6 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी या गँगस्टरची गठडी वळली. अंगझडतीत त्याच्याकडे कोणतीही आक्षेपार्ह वस्तू वा शस्त्र आढळून आले नाही. हा गँगस्टर त्याच्या एका साथीदाराला भेटण्यासाठी डोंबिवलीत आल्याची माहिती मिळाली. हा साथीदार अश्विन नाईक गँगचा अटक केलेला शूटर धर्मराज शेडगे याच्या मदतीने डोंबिवलीत मोठा गुन्हा करण्यासाठी आला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. पोलिसांनी कस्सून चौकशी केल्यानंतर गुंड धर्मराज याने आपल्यावर असलेले गुन्हे आणि न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यांचा पाढा वाचला. 5 – 6 महिन्यांपूर्वी खंडणीसाठी दिवा भागातील भगत नावाच्या बिल्डरला धमकावल्याचा गुन्हा मुंब्रा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा आणि मुंबईच्या विक्रोळी पोलिस ठाण्यात खुनाचे 2 गुन्हे दाखल आहेत. तर घरफोड्यांच्या गुन्ह्यांच्याही त्याच्या नावे नोंदी आहेत. नाशिकच्या उपनगर पोलिस ठाण्यात 4 साथीदारांसह त्याच्या विरोधात सशस्त्र लुटीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असलेला गुंड धर्मराज याला नाशिक क्राईम ब्रँचचे पोलिस शोध घेत होते.