अपघातातील मृतांंवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – नाशिक नजीक काल पहाटेच्या सुमारास उज्जैन येथून परतत असताना अपघात झालेल्या कल्याणातील १० भाविकाच्या मृतदेहावर आज सकाळी शोकाकुल वातावरणात गणेशघाट स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मृताच्या नातेवाईकाबरोबर महापालिकेचे कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
कल्याण मधील सुभाष मैदानालगत असलेल्या अंबे नगर व इंदिरा नगर येथील रुखी समाजाच्या वसाहतीतील २५ भाविक उज्जैन येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन करून परतत असताना या भाविकाच्या गाडीला झालेल्या दुर्दैवी अपघातात १५ जण जखमी झाले तर १० जणांवर काळाने घाला घातला जखमींवर नाशिक येथील सरकारी आणी खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातात मृत्यू मुखी पडलेल्याचे मृतदेह उत्तरीय तपासणी नंतर काल रात्री कल्याणात आणण्यात आले. हे मृतदेह रात्रभर पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आले होते. आज सकाळी ११ वाजता सुभाष मैदानातून ट्रक मधून हे मृतदेह गणेश घाट येथील स्मशान भूमी पर्यत नेत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.एकाच परिसरातील १० जणांंचे मृतदेह पाहून या परिसरात शोककळा पसरली होती.
मृतांच्या कुटुंबियांना व जखमींना पालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींचा मदतीचा हात
काल च्या अपघातात जखमी झालेले व मृत झालेले हे सर्व पालिकेचे निवृत्त आणि विद्यमान सफाई कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय आहेत.त्यांच्या मदतीसाठी आज पालिका आयुक्तांंसोबत लोकप्रतिनिधींची बैठक झाली या बैठकीत या गरिबांना तातडीने योग्य उपचार मिळणे गरजेचे असून त्यांना उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याने पालिकेतील १२७ लोकप्रतिनिधीचे एक महिन्याचे मानधन महापौर स्वेच्छा निधीत जमा करण्याचा निर्णय सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवक, महापौर आणि आयुक्तांनी घेतला .तसेच यावेळी महापौर विनिता राणे यांनी पालिकेच्या अधिकारी कर्मचा-यांंनी आपले एक दिवसाचे वेतन स्वेच्छेने या जखमीच्या मदतीसाठी देण्याचे आवाहन केले आहे. या निधीतून जखमींच्या उपचारासाठी आर्थिक सहाय्य करत त्यांचा अमुल्य जीव वाचविण्यासाठी मदत केली जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले.