अनधिकृत बांधकाम प्रकरणी अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांना सेवेतून बडतर्फ करा
(श्रीराम कांदु)
डोंबिवली –आपल्यावर दाखल झालेला गुन्हा पूर्णपणे खोटा असून अपहरण किंवा जातीवाचक शिवीगाळ करण्यात आणि इतर गुन्ह्यात आपला कोणताही संबंध नाही. आपण सातत्याने अनधिकृत बांधकामांविरोधात आवाज उठवला म्हणून आवाज बंद करण्यासाठी गुन्हा दाखल केला आहे. प्रभाग अधिकाऱ्यांशी झालेली भेट केवळ योगायोग असून महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग उपायुक्त सुरेश पवार यांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांच्या संगनमताने आपल्याला या प्रकरणात गोवले आहे घरत व पवार यांना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी पत्रकार परिषदेत केला .
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे `ई` प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांनी डोंबिवली येथील नांदिवली येथील अनधिकृत ढाब्यावर कारवाई केल्याने भाजप नगरसेवक शैलेश धात्रक आणि विरोधी पक्ष नेते मंदार हळबे यांनी वाहन अडवून अपहरण करीत जातीयवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नगरसेवक शैलेश धात्रक व विरोधी पक्ष नेता मंदार हळबे यांनी हे आरोप खोटे असल्याचे सांगत या आरोपाचे खंडन केले.कल्याण येथे विरोधी पक्ष नेते हळबे यांनी पत्रकार परिषद घेतली. या संपूर्ण प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही तरीदेखील महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत,अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त सुरेश पवार, प्रभाग क्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी संगणमताने षडयंत्र रचुन मला या प्रकरणात गोवल्याचा आरोप यावेळी हळबे यांनी केला. महापालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावात मुख्यमंत्र्यानी ग्रोथ सेंटर सह स्मार्ट सिटी योजनेत अनेक महत्वकांक्षी प्रकल्प प्रस्तवित केले आहेत. मात्र या भागात बेकायदा बांधकामाना अभय देत अतिरिक्त आयुक्त संजय घरत , अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त सुरेश पवार ,त्यांचे अधिनस्थ प्रभाग क्षेत्र अधिकारी व कर्मचारी या प्रकल्पला सुरुंग लावण्याचे काम करत असून या अनधिकृत बांधकामामधून होणारी आर्थिक उलाढाल ही ५०० कोटींच्या घरात असुन या उलढालीमुळे भुमाफियांशी संगनमत करून माझ्या राजकीय कारकीर्दीस संघटितपणे गालबोट लावण्याचे कारस्थान सुरू असल्याचा आरोपहि हळबे यांनी केला. अनधिकृत बांधकामांसाठी जबाबदार ठरवून संजय घरत आणि सुरेश पवार यांना महापालिका सेवेतून बडतर्फ करावे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम ३९७ अन्वये जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीचा प्रस्ताव पुढील महासभेसमोर सादर करणार असल्याचे हळबे यांनी संगीतले.
या संदर्भात उपायुक्त सुरेश पवार यांना विचारले असता त्यांनी या आरोपाचा इन्कार केला व जी कारवाई केली त्या संदर्भात काहीच पूर्व कल्पना नव्हती असा दावा केला तर अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याशी वारंवार संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.