अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सत्याग्रही स्वराज्य सैनिक जाणार दिल्लीला !
नगर – पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिना निमित्त त्यांना अभिवादन करुन, दिल्लीगेट येथे सत्याग्रही स्वराज्य सैनिकांची नोंदणी केली. हे स्वराज्य सैनिक लोकपाल कायदा व देशातील शेतकर्यांच्या प्रश्नाबाबत दि.२३ मार्च रोजी दिल्ली येथे होणार्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाणार आहेत. तर गावपातळीवर आंदोलन करुन त्यांना पाठिंबा दर्शविणार आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुकारलेले आंदोलन हे लोकशाहीला पुरक आहे. लोकपाल कायद्यासाठी सातत्याने चालू असलेल्या लढ्याला सन २०१३ साली यश आले. मात्र मोदी सरकारने भ्रष्टाचार संपविण्यासाठी कुठल्याही प्रकारची ठोस उपाय योजना न करता, देशात लोकपाल गठित होवू दिले नाही. पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने लोकपाल कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची वारंवार मागणी करण्यात आली.यासाठी नो लोकपाल, नो मोदी हे आंदोलन देखील करण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. देश स्वातंत्र्य झाला असला तरी सर्वसामान्य नागरिकांना याची फळे मिळाली नाहीत. सध्या इंग्रज राजवटीपेक्षा जास्त शोषण सर्वसामान्य नागरिकांचे चालू आहे.या शोषणाच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी व सर्वसामान्य नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सत्याग्रही स्वराज्य सैनिकांची फळी उभारली जात असल्याचे गवळी यांनी म्हटले या चळवळीसाठी अॅड.कारभारी गवळी, कॉ.बाबा आरगडे, अर्शद शेख, कॉ.महेबुब सय्यद, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अशोक भोसले, अंबिका नागुल, सखुबाई बोरगे, हिराबाई ग्यानप्पा आदि उपस्थित होते.